Your Own Digital Platform

पाटण ढेबेवाडी बसस्थानकात कंडक्टरची आत्महत्या


सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ढेबेवाडी येथील बसस्थानकात कंडक्टर आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली असून संबंधित कंडक्टर यांची मुंबईत फसवणूक झाल्याने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे. पोलिस सूत्रांनी आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समोर आले नसल्याचे सांगितले आहे.नानासोा गंगाराम ताईगडे (वय ५७, रा. ताईगडेवाडी, ता. पाटण) असे आत्महत्या केलेल्या कंडक्टर यांचे नाव आहे. ते शुक्रवारी दुपारी एक वाजल्यापासून पाटण - ढेबेवाडी या पाटण आगाराच्या एसटीवर कर्तव्य बजावत होते. रात्री आठच्या सुमारास संबंधित एसटी ढेबेवाडी बसस्थानकात मुक्कामी आली होती.

त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास ताईगडे यांच्यासोबत दुसऱ्या मुक्कामी एसटीमध्ये असलेले चालक रमेश पांडुरंग पवार (रा. गुढे) आणि त्याचे सहकारी जेवण करून एसटीमध्ये झोपले होते. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास पवार हे गजानन कचरे या सहकाऱ्यासह उठले होते. त्यावेळी बसस्थानकात असलेल्या हॉटेललगत लोखंडी अँगलला काहीतरी लटकत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याठिकाणी जाऊन पाहिले असता नानासोा ताईगडे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आल्याने त्यांनी घटनेची माहिती तातडीने वरिष्ठांना दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, ताईगडे यांची मुंबईत एका एजंटाने फसवणूक केल्याची चर्चा असून त्यामुळेच नैराश्यातून फसवणूक झाल्याने ताईगडे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा घटनास्थळी होती.