कोयनेत १५६ टीएमसी पाण्याची आवक


पाटण : जून ते सप्टेंबर हा पावसाचा तांत्रिक हंगाम संपला असताना आगामी आठ महिन्यांसाठी कोयना धरणात तब्बल 97.50 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. चालूवर्षी सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्याने येथे तब्बल 154.59 टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यातील 56.44 टीएमसी पाणी न वापरताच सोडून देण्यात आले. तर 27.77 टीएमसी पाण्याचा सिंचन व वीजनिर्मितीसाठी वापर करण्यात आला आहे. 

चालवर्षीचा जून महिना ते पुढील वर्षाचा मे महिना असे कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष असते. या वर्षापैकी पावसाळ्याचे चार महिने आता संपले आहेत. या काळात येथे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल सरासरी सातशे ते आठशे मिलीमीटर जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात तब्बल 154.59 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीला 15.84, पूर्वेकडे सिंचनाला 3.48 तर पूरकाळात 8.45 अशा एकूण 27.77 टीएमसी पाण्यावर आत्तापर्यंत 816.582 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. यापुढे आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना धरणात 97.50 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आरक्षित 67.50 टीएमसी पाण्यापैकी चार महिन्यात 15.84 वापर झाल्याने यातील कोट्यापैकी 51.66 टीएमसी गरज आहे. सिंचनासाठी 3.48 वापर झाला असून आगामी काळासाठी सुमारे तीस टीएमसीची गरज आहे. 

त्यामुळे या गरजेच्या 81.66 टीएमसीच्या पार्श्‍वभूमीवर धरणात तब्बल 97.50 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळातील कोयना धरणातील पाण्यावर अवलंबून असणार्‍या सिंचन व वीजनिर्मितीचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. त्यानंतरही धरणात पाणीसाठा शिल्लक रहाणार आहे, हे या तांत्रिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. चालूवर्षी सिंचन व वीजनिर्मिती याचा तुलनात्मक जास्त पाणी वापर होऊन त्याहीपेक्षा अधिक पाणी विनावापर सोडण्यात आले. तरीही सध्याचा शिल्लक पाणीसाठा हा सार्वत्रिक गरज भागविणारा आहे. तर अजूनही दरम्यानच्या काळात होणार्‍या पावसामध्ये धरणात काही टीएमसी पाण्याची आवक होणार असल्याचे चालू वर्षात कोयनेच्या पाण्यावर अवलंबून असणारे भवितव्य निश्‍चितच उज्ज्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments

Powered by Blogger.