संधी मिळाल्यास माढा लोकसभा लढविणार : प्रभाकर देशमुख


सातारा : सनदी अधिकारी म्हणून काम केल्याने राज्याबरोबरच केंद्राच्या योजनांची माहिती आहे. त्या योजनांसाठी येणार्‍या निधीतून कशा पद्धतीने विकासकामे करता येतील याची माहिती आहे. तसेच सोलापूर, सातारा जिल्ह्यात लोकसंपर्क असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्यास माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार, अशी भूमिका माजी विभागीय आयुक्त व माणदेशचे सुपुत्र प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. प्रभाकर देशमुख म्हणाले, विधानसभा निवडणूक लढण्यापेक्षा माढ्यातून लोकसभा निवडणूक लढायला आवडेल. 

राज्याबरोबरच केंद्र सरकारकडून राबवल्या जाणार्‍या योजनांची चांगली माहिती असल्यामुळे मनरेगा, आयडब्ल्यूएमपीसारख्या अनेक योजनांतून विकासकामे करता येतील. विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करून त्यासाठी निधी आणू शकतो. आयुक्त असताना मनरेगातील त्रुटी खा. सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल पंतप्रधानांना घ्यावी लागली. त्याचा पुढे जीआर निघाला. अनुभव असल्याने लोकसभा निवडणुकीतून चांगले काम करू शकेन. विद्यमान खासदारांना माझा कसलाही विरोध नाही. मी फक्त माझी बाजू मांडली. केंद्रात काम करायला आवडेल, हे खा. शरद पवार यांना पूर्वीच सांगितले आहे.

दुष्काळी भागाला त्यांनी नेहमीच झुकते माप दिले आहे. लोधवडेत जलसंधारणाच्या कामाची पहाणी करायला आले त्यावेळी त्यांच्याकडे 4-5 लाखांचा निधी मागितला तर त्यांनी काही तासांतच 5-6 कोटी दिले. लोकसभेचे तिकीट मिळेल की नाही माहीत नाही, पण दररोज फोन करून लोक आग्रह करत आहेत. करमाळा, माढा या परिसरात काम केल्याने तेथील लोक संपर्कात आहेत. तिकीट नाही मिळाले तरी आहे या कामात मी समाधानी असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

No comments

Powered by Blogger.