Your Own Digital Platform

आंदोलनामुळे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात


सातारा : पोवई नाक्यावरील कालिदास पेट्रोलपंपासमोरील जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी शुक्रवारी दुपारी भर उन्हात रान तापवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस व सातारा नगर पालिकेने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अतिक्रमण केलेला परिसर मोकळा करण्यासाठी पालिकेने यंत्रणा राबवली.पोवई नाक्यावर अतिक्रमण असल्याबाबत शिवसेनेचे स्थानिक नेते नरेंद्र पाटील यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. शांतता कमिटी बैठक, नगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी तक्रारी केल्यानंतरही प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. यामुळेच शुक्रवारी दुपारी नरेंद्र पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत त्याठिकाणी गेले. नगरपालिका व पोलिसांना या घटनेची माहिती देवून जोपर्यंत अतिक्रमण केलेला परिसर मोकळा होणार नाही तोपर्यंत तेथून हटणार नाही. प्रसंगी कायदा व सुव्यवस्था हातात घ्यावा लागला तर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व घडामोडीमुळे पोवई नाक्यावरील वातावरण गरम झाले. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अतिक्रमणाबाबत नरेंद्र पाटील यांनी पालिका प्रशासनाला सळो की पळो करुन सोडले. प्रत्येकवेळी कारवाईचे आश्वासन देवून यंत्रणा मॅनेज होत असल्याचा आरोप केला. आता जोपर्यंत हे अतिक्रमण निघणार नाही तोपर्यंत तेथून हटणार नसल्याचा पवित्रा घेतला.

ही चर्चा सुरू असतानाच मुख्य रस्त्यालगत कंपाउंडचे काठ्यांनी बांधलेले सुरक्षाकवच त्यांनी स्वत: उचकटून टाकले. वाहनांची कोंडी कमी झाली पाहिजे असे सांगून आपण कोणाला घाबरत नसल्याची डरकाळी त्यांनी फोडली. अखेर पालिकेने कागदपत्रांचा सोपस्कार करुन अतिक्रमण विभागातील इतर कर्मचारी बोलावून घेतले. अतिक्रमण असलेला परिसर मोकळा करणार असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर परिसरातील तणाव कमी झाला. दरम्यान, अतिक्रमण हटवण्यासाठी जेसीबीही बोलवण्यात आला. जेसीबी येण्यासाठी वेळ असल्याने सर्वजण त्याठिकाणी थांबून होते.