Your Own Digital Platform

सातारा : पोलिसांकडून जुगार अड्डा उद्ध्वस्त; तीस जणांवर कारवाई


कराड : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कै. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हॉलमध्ये सुरू असलेला पत्त्यांचा जुगार अड्डा पोलिसांनी उध्वस्त करून ३० जणांवर कारवाई केली. या कारवाईमुळे कराड शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल रात्री (शनिवार) डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगरपालिकेजवळ असलेल्या कै. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हॉलमध्ये अवैधरित्या पत्त्या जुगार खेळला जात असल्याची माहिती डीवायएसपी नवनाथ ढवळे यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार डीवायएसपी ढवळे यांनी खात्री करून घेतल्यानंतर तेथे कारवाई करण्याच्या सूचना पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक तपासे यांना दिल्या. त्यानुसार त्यांनी अण्णाभाऊ साठे हॉलमध्ये अचानक छापा टाकला.

यावेळी पोलिसांना हॉलमध्ये एकाच वेळी ३० जन जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये रोख रक्कम, पत्त्या, जुगाराचे साहित्य, मोबाईल, मोटरसायकल यांचा समावेश आहे.डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कापसे, पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर बर्गे, पवार, चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली