Your Own Digital Platform

सीओंना स्मरणपत्र अन् मलमपट्टी सुरू


कराड : सुमारे 11 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या कराडमधील रस्त्याच्या तक्रारीबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना करूनही मुख्याधिकार्‍यांनी चार महिन्यांनंतरही जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला नसल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्याच वेळी अचानकपणे पुन्हा या रस्त्याची ‘मलमपट्टी’ सुरू करण्यात आली आहे. 

म्हणूनच, ‘मलमपट्टी’ हा निव्वळ योगायोग की, ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे का, अशी शंका उपस्थित झाली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका यादरम्यानच्या मार्गासाठी 11 कोटी रुपये मंजूर केले होते; मात्र या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्यानंतर प्रथमपासून तो सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी झाकीर पठाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा दावा करत तक्रार केली होती. त्यानंतर 2 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्याधिकार्‍यांना या रस्त्याच्या कामाचा स्वयंस्पष्ट मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याबाबतची सूचना करणारा लेखी आदेश देण्यात आला होता. त्यानंतर मुख्याधिकार्‍यांकडून लवकरात लवकर हा अहवाल सादर होणे अपेक्षित होेते.

मात्र तसे झालेले नसल्याचा दावा तक्रारदार झाकीर पठाण यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात 17 ऑक्टोबरला झाकीर पठाण यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपला अहवाल प्राप्‍त झालेला नाही. त्यामुळे हा अहवाल त्वरित पाठवावा, असे स्मरणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्याधिकार्‍यांना पाठवण्यात आले आहे. या पत्राची प्रत आपणासही देण्यात आली असल्याचा दावा करत ती प्रतही पठाण यांनी दाखवली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारच्या पार्श्‍वभूमीवर 11 कोटीच्या रस्त्याची पुन्हा डागडुजी सुरू करण्यात आली आहे. वास्तविक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता उखडतोच कसा ? असा प्रश्‍न निर्माण झाला असून आता मलमपट्टी करून रस्ता किती दिवस टिकणार हाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळेच मलमपट्टी करून ठेकेदाराकडून निकृष्ट कामावर ‘पडदा’ टाकण्याचा तर प्रयत्न सुरू नाही ना ? पहिल्याच पावसात रस्ता उखडूनही नगरपालिका प्रशासन, सत्ताधारी गप्प का आहेत ? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.