Your Own Digital Platform

जिल्ह्यात दोन ठिकाणी १६ लाखांचा गुटखा जप्त


ओझर्डे : आनेवाडी टोलनाक्यावर एर्टिगा व्हॅनमधून सुमारे 12 लाखांचा गुटखा भुईंज पोलिसांनी पकडला असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.साताराकडून वाईकडे एर्टिगा कार क्र. एमएच 11 सीजी 6793 मधून गुटक्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती वाईचे डीवायएसपी अजित टिके यांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. त्यांनी पोलिस हवालदार श्रीनिवास बिराजदार, उमेश लोखंडे यांना रविवारी रात्रीपासूनच आनेवाडी टोल नाक्यावर सापळा लावण्याचे आदेश दिले होते. त्याठिकाणी बिराजदार व लोखंडे हे साध्या वेशात दबा धरुन बसले होते. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास साताराकडून इर्टिका कार आनेवाडी टोल नाक्यावर आली असता ती थांबवण्यात आली.

त्यामध्ये गुटखा भरलेली पोती पाठीमागील सिटवर आढळून आली. त्यात काय आहे? असे चालक मालक असलेले सतिश जयवंत पवार रा. गंगापुरी वाई आणि विनायक पांडुरंग जाधव रा. कणूर यांना विचारले असता त्या दोघांनी गुटका असल्याचे सांगितले.

पोलिसांनी विनापरवाना गुटखा वाहतूक करत असल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करुन कारही जप्त केली. एकुण 12 लाखांचा माल जप्त करण्यात आला.

राहत्या घरातील बेकायदेशीर गुटखा साठ्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे 4 लाख रुपये किमतीचा 257 किलो वजनाची 37 पोती गुटखा जप्त केला. कराड शहर पोलिसांनी सोमवारी (दि. 29)दुपारी केलेल्या या कारवाईत एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून त्याने गुटख्याचा बेकायदेशीर साठा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.

तन्वीर रियाज वाईकर (रा. गार्डेकर बोळ, पायर्‍याखाली, शनिवार पेठ, कराड) असे पोलिसांनी कारवाई केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना शनिवार पेठेतील तन्वीर वाईकर याने आपल्या राहत्या घरी गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा केल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाली. या माहितीची खात्री केल्यानंतर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्वप्नील लोखंडे यांनी सोमवारी दुपारी तन्वीर वाईकर याच्या घरावर अचानक छापा टाकला. या छाप्यामध्ये वाईकर यांने राहत्या घरात गुटखा पान मसाला बेकायदेशीर रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने परवानगी नसतानाही ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी सर्व गुटखा जप्त केला असून तन्वीर वाईकर याला ताब्यात घेतले आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी सुमारे 3 लाख 80 हजार 948 रुपयांची 257 किलोंची 37 पोती गुटखा जप्त केला आहे.

डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस हवालदार राजेंद्र पुजारी, सतीश जाधव, प्रदीप कदम, नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलीस नाईक प्रमोद पवार, सचिन साळुंखे, संजय जाधव, पोलीस शिपाई मारुती लाटणे, सचिन गुरव, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव व पोलिस कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, शहरात मध्यवर्ती ठिकाणी गुटख्याचा साठा जप्त केल्याने नागरिकांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे. साठा केलेला गुटखा तन्वीर वाईकर याने कुठून आणला? तू विक्रीसाठी कोणकोणत्या ठिकाणी दिला जाणार होता? याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग घेणार का? याबाबत शहरात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होते.

पानमसाला गुटखा हा प्रतिबंधित अन्नपदार्थ आहे. विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचा साठा करून ठेवल्याचे स्पष्ट झालेे आहे. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित तन्वीर वाईकर यांच्यासह जप्त केलेला गुटखा पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी शहा यांच्या ताब्यात दिला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग याबाबत पुढील कारवाई करणार आहे.