Your Own Digital Platform

तरुणाईला आता रास दांडियाचे वेध


सातारा : नवरात्रौत्सवाला बुधवारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाल्यानंतर आता तरूणाईला रास दांडियाचे वेध लागले आहेत. ‘ढोली तारो ढोल बाजे, पंखिडा... पंखिडा...’ यासह विविध हिंदी, मराठी, गुजराती गाण्यावर सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वत्र रास दांडिया, गरब्याची धुम सुरू होणार आहे. त्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांचीही धामधूम शिगेला पोहोचली आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागातील चौकाचौकात, गल्ली बोळात दांडियाच्या टिपर्‍या प्रत्येकाला ठेका धरायला लावणार आहेत.

‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात सातारा शहरासह जिल्ह्यात आदीशक्ती, आदीमायेचा जागर भक्तीमय वातावरणात बुधवारी सुरू झाला. नऊ दिवसांचा हा उत्सव शहराबरोबर ग्रामीण भागातही तितक्याच उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा होत आहे. पहाटेच्यावेळी देवीच्या आरतीला मोठ्या संख्येने महिला व नागरिकांची गर्दी होणार आहे.

या नवरात्रोत्सवामधील मुख्य आकर्षण असलेल्या रास दांडिया - गरबाचे लोण आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही पोहोचले आहे. त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसमोर दांडियाची लगबग सुरू झाली आहे. बुधवारी नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असल्यामुळे आता लवकरच शहरासह जिल्ह्यात ‘मायो गरबो घुमतो जाय’ असा जल्लोष पहायला मिळणार आहे.

पूर्वी अत्यंत पारंपारिक पध्दतीने चौकाचौकात खेळल्या जाणार्‍या रास दांडिया गरब्याचे स्वरूप गेल्या काही वर्षापासून बदलत चालले आहे. जुन्या पारंपारिक गरब्याच्या गुजराथी गाण्यापेक्षा डीजेच्या तालावर बेभान होवून थिरकणारी तरूणाई गल्लोगल्ली दिसू लागली. सार्वजनिक दांडियाबरोबरच आता याला व्यावसायिक स्वरूपही आले. अपार्टमेंट, चाळीत, गल्लीत साजर्‍या होणार्‍या नवरात्रोत्सवाला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले. रास दांडिया गरब्याची बक्षीसे जिंकण्यासाठी तरूणाईमध्ये चढाओढ सुरू झाली. विविध पदाधिकार्‍यांनी मंडळांना दांडिया भरवण्यासाठी प्रोत्साहन दिलेे तर काही मंडळे रास दांडिया, गरबा यातील नृत्यकला जपताना दिसत आहेत.

सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध नवरात्रौत्सव मंडळांसमोर तरुणाईबरोबर बालगोपाळही रास दांडिया खेळण्यासाठी सहभागी होतात. दांडियासाठी आधुनिक आणि पारंपारिकतेची सांगड घातली जात आहे. हा बदल अगदी पेहरावापासून दागदागिन्यांतून दिसून येत आहे. या दांडियाच्या परंपरेला साजेसा घागरा चोली, कुडता हा हटके ट्रेंड हल्लीच्या तरूणाईमध्ये बघायला मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात तरूणाईला आकर्षित करण्यासाठी सध्या सेलिब्रिटीजना सोबत घेवून रास दांडिया खेळण्याची पध्दत ठिकठिकाणी रूढ झाली आहे. डिस्को लाईट, झालेली भली मोठी गर्दी यामुळे तरुणाईला नाचण्याचा मोहही आवरत नसल्याचे चित्र ठिकठिकाणच्या दांडिया महोत्सवात पहायला मिळते.
टिपर्‍यांचे विविध प्रकार
महाराष्ट्रीयन टिपरी

केरळी टिपरी

गुजराती टिपरी

संखेडा टिपरी

म्युझिकल टिपरी

बेअरींग टिपरी

राजस्थानी टिपरी

काचेची टिपरी

अ‍ॅक्रालिक टिपरी

लाकडी टिपरी

चांदीची

मेटालिक टिपरी

लाईटची टिपरी