सहकारमंत्र्यांचा स्वाभिमानी संघटनेकडून निषेध


फलटण : न्यू फलटण शुगर वर्क्स या खासगी साखर कारखान्याने अजूनही मागील गाळप हंगामाचे पैसे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठ ते दहा महिन्यांत विविध बैठका, मोर्चे, आंदोलने केली. परंतु, महसूल प्रशासन व साखर आयुक्‍त कार्यालयाकडून त्यांना फक्‍त तारीखच देण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या बिलासंदर्भात आजपर्यंत ना मंत्री ना सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यातच रविवारी फलटण दौर्‍यावर आलेल्या सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी स्वाभिमानी आणि शेतकर्‍यांना भेट न दिल्याने निषेध व्यक्‍त करत घोषणाबाजी करण्यात आली. फलटणमधील न्यू फलटण शुगर वर्क्सने ऊस उत्पादक शेतकर्‍यांची 51 कोटींची देणी अजून दिलेली नाही. 

त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारंवार बैठका, आंदोलन, मोर्चे काढून बिले मिळण्याविषयी भूमिका घेतली होती. त्यानंतर तब्बल 27 दिवस ठिय्या आंदोलनही करण्यात आले. यावर पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी मध्यस्थी करून हे आंदोलन स्थगित केले. मात्र, यावर अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही. रविवारी सहकार मंत्री ना.सुभाष देशमुख फलटण दौर्‍यावर आले होते. यावेळी बिलासंदर्भात चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गेले होते. मात्र, ना. देशमुख यांनी शेतकर्‍यांची भेट नाकारल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहकार मंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद, धिक्‍कार असो धिक्‍कार असो सुभाष देशमुख यांचा धिक्‍कार असो अशी घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ गोंधळ उडाला.

दरम्यान, यावेळी स्वाभिमानीचे युवा आघाडीचे अध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी हे सरकार शेतकर्‍यांच्या विरोधात कट कारस्थान रचत असल्याचा आरोप केला. यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस डॉ.रवींद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव,प्रमोद गाडे,सचिन खानविलकर व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.