मुख्याधिकार्‍यांविना नगरपंचायत ‘बेवारस’


पाटण : पाटणला ग्रामपंचायतीची नगरपंचायत आणि सरपंचांचा नगराध्यक्ष तर सदस्यांचा नगरसेवक झाला. मात्र येथे बदललेल्या विकासात्मक ध्येय-धोरणे व नवीन नियमांसाठी महत्त्वपूर्ण असणार्‍या मुख्याधिकारी पदाची साडेसाती काही केल्या दूर होत नाही. जवळपास दोन वर्षे पूर्णत्वाला येत असलेल्या या कारभारात सुरूवातीला हे पद असून अडचण नसून खोळंबा असे होते. तर गेल्या सहा महिन्यांत येथे कायमच ‘प्रभारी’ त्यामुळे पाटणवासीयांच्या नागरी सुविधा असो किंवा प्रश्‍न हे बेवारस असल्याने वरिष्ठ पातळीवरून याबाबत काही व्यवस्था होणार आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरीकांमधून विचारला जात आहे.पाटणला नगरपंचायत जाहीर होताच त्याचे उत्साहात सार्वत्रिक स्वागत करण्यात आले. 

नागरिकांना नवनवीन सुविधा, उपक्रम व योजना याचा लाभ होणार हे स्वाभाविकच अपेक्षित होते. मात्र येथे गेल्या दोन वर्षांचा प्रशासकीय असो किंवा राजकीय कारभार पहाता सार्वजनिक पेक्षा वैयक्तिक बाबींवरच अधिकाधिक भर दिला जात असल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. प्रशासकीय महत्वाचे पद असलेल्या मुख्याधिकार्‍यांना येथे रस नसल्याने मग निश्‍चितच याचा सार्वत्रिक विकास व नागरी सुविधा तसेच समस्यांवरही गंभीर व विपरीत परिणाम होत आहेत.

सुरूवातीला पहिल्या टप्प्यात लाभलेल्या मुख्याधिकारी यांचा बहुतांशी वेळ हा त्यांच्या अन्यत्र सेवेत जाण्यासाठीच्या अभ्यासात तर दरम्यानचा काळातच ‘शुभमंगल सावधान’मध्ये गेला. त्यामुळे इथला कारभार हा सातत्याने कराड, मलकापूर मुख्याधिकार्‍यांकडे जात संगीत खुर्चीचा कार्यक्रम सुरू असायचा. तत्कालीन मुख्याधिकारी त्यांच्या दोन्ही मोहिमेत याच ठिकाणी यशस्वी झाले. एका बाजूला डोक्यावर अक्षता तर दुसरीकडे अपेक्षित ठिकाणी नोकरी मिळाल्याने त्यांनी इथला कारभार तथा संसार मध्येच सोडला. त्यामुळे मग स्थानिक नागरिक तथा वर्‍हाडी मंडळी या लगीनघाईत कायमच पंगती पडूनही उपाशीच राहीली.

संबंधित मुख्याधिकारी जाऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही ही खुर्ची रिक्तच आहे. प्रशासकीय स्तरावर याला भलेही प्रभारीचे लेबल चिटकवले गेले असले तरी लेबलला चिकटपणा नसतो त्याप्रमाणेच मग संबंधितांचा प्रभारी कारभारही येथे पहायला मिळतो. गेल्या सहा महिन्यांपासून हा कारभार कराडच्या मुख्याधिकार्‍यांकडे आहे त्यांना कराडच्या कारभारातूनच वेळ मिळत नसल्याने मग ते पाटणला कसा न्याय देणार? हा महत्वाचा प्रश्‍न आहे.

मध्यंतरी ते परदेशात गेले त्यावेळी कोरेगाव मुख्याधिकारी यांना हा संगीत खुर्चीचा मान मिळाला, त्यांनीही येथे येण्याऐवजी ‘ऑनलाईन’ कारभार केला. त्यानंतर पुन्हा प्रभारी कारभारी कराडकरच अशी अवस्था आहे. संबंधित प्रभारी अधिकारी इच्छा असूनही येथे पूर्ण वेळ देवू शकत नाहीत. त्यामुळे स्थानिक जनतेच्या दैनंदिन कामासाठी लागणार्‍या संबधितांच्या स्वाक्षर्‍या असो किंवा विकासात्मक कामे सुचविणे, मंजूर करून आणणे व ती पूर्ण करणे यांसह स्थानिक पातळीवर पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, कचरा विल्हेवाट आदी प्रश्‍न कमी होण्यापेक्षा ते अधिकाधिक वाढलेले आहेत. याचा वरिष्ठ पातळीवरून गांभीर्याने विचार करून येथे तातडीने सक्षम व कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमावा अशा मागण्या होत आहेत.

No comments

Powered by Blogger.