सातारचा सूर्या डॉग चंदीगडमध्ये लय‘भारी’


सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) ‘सूर्या’ हा नवा श्‍वान (डॉग) दाखल झाला असून त्याने चंदीगड येथील ट्रेनिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या प्रशिक्षणात तो अव्वल ठरला आहे. महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये ‘सूर्या’ व त्याच्या दोन्ही पोलिस कर्मचारी ‘हॅन्डलर’नी लाजवाब कामगिरी केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सूर्यापेक्षा अधिक महागडे डॉग असतानाही त्यांना मागे टाकण्यात सातारच्या पथकाला यश आले आहे.सातारा जिल्हा पोलिस दलांतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक (बॉम्ब डिटेक्शन अ‍ॅन्ड डिस्पोजल स्कॉड) अर्थात बीडीडीएस कार्यरत आहे.

 या पथकामध्ये एकूण तीन डॉग कार्यरत आहेत. जंजिरा, प्रिन्स व रुद्र अशी या तीन डॉगची नावे आहेत. यातील जंजिरा डॉग सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाल्याने त्याच्या जागी ‘सूर्या’ हा लॅब्रोडॉर जातीचा श्‍वान सातारा पोलिस दलात दाखल झाला. सध्या पोलिस दलात प्रिन्स त्यानंतर रुद्र व आता नव्या दमाचा सूर्या असे त्रिकुट कार्यरत आहे. हे तिन्ही डॉग लॅब्रोडॉर जातीचेच आहेत.बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत होण्यासाठी नव्या श्‍वानाचे वय 10 ते 12 महिन्यांचे असावे लागते. सूर्या 12 महिन्यांचा असताना सातारा पोलिस दलात दाखल झाल्यानंतर त्याला ट्रेनिंगसाठी एप्रिल महिन्यात चंदीगड येथे पाठवण्यात आले. यासाठी पोलिस हवालदार निलेश दयाळ व सागर गोगावले या दोघांची हॅन्डलर (डॉगची देखभाल करणारे) म्हणून नियुक्‍ती झाली. डॉगचे एकूण सहा महिन्यांचे ट्रेनिंग असते.

 यामध्ये पहिले तीन महिने बेसीक ट्रेनिंग व त्यानंतर अ‍ॅडव्हांन्स ट्रेनिंग असते. तसेच डॉगसह त्याला हॅन्डल करणार्‍या पोलिसांची लेखी परिक्षाही घेतली जाते. अर्थात सर्व ट्रेनिंग झाल्यानंतर अंतिमत: परीक्षा घेतली जाते. ट्रेनिंग कालावधीतच हॅन्डलर व डॉगला ट्रेनिंग दिले जाते. डॉग ट्रेनिंगची परीक्षा पाच टप्प्यात असते. यामध्ये बॉम्ब जमिनीत असताना, माणसाकडे असताना, बिल्डींगमध्ये असताना, बॉम्ब लगेजमध्ये असताना डॉगने व हॅन्डलरने नेमके काय करायचे हे ट्रेनिंगमध्ये शिकवले जाते. त्यानुसार अंतिम परीक्षा घेवून कोणता डॉग व हॅन्डलर उत्कृष्ठपणे अधिक ग्रेडने पास होतो त्यानुसार त्यांचा महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक व ट्रेनिंग सेंटरमधील पोलिस अधीक्षकांच्या हस्ते मानपत्र देवून सत्कार केला जातो.

सातारा पोलिस दलातील दोन पोलिस सूर्या डॉगसह चंदीगड येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी तेथे आपला ठसा उमटवला. प्रशिक्षणातील सर्वच कसोट्यांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. यावेळी महाराष्ट्रातील इतर 17 जिल्ह्यातीलही डॉग स्कॉड ट्रेनिंगसाठी दाखल झाले होते. मात्र त्या सर्वांमध्ये साताराच सरस ठरला.

सातारकरांच्या सेवेसाठी दाखल झालेला ‘सूर्या’ हा नवा डॉग लॅब्रोडॉर जातीचा आहे. वास्तविक यापेक्षाही जर्मन व शेफर्ड जातीचे डॉग हे सरस म्हणून ओळखले जातात. सूर्या डॉग हा तसा 30 हजार रुपये किंमतीचा आहेे. चंदीगड येथे झालेल्या ट्रेनिंगसाठी राज्यातील इतर 17 जिल्ह्यातून आलेल्या डॉगमध्ये 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत शेफर्ड व जर्मन डॉगही सहभागी होते. असे असतानाही सातारचा सूर्या डॉग या सर्वांना भारी पडला.

श्‍वानाच्या मदतीने बॉम्बसारख्या घातक शस्त्राची पडताळणी करुन तो बॉम्ब निकामी करण्याचे मोठे दिव्य बॉम्बशोधक पथकाला करावे लागते. यासाठी प्रथमत: श्‍वानावर प्रेम करणारा पोलिसच महत्वाचा ठरतो. तसेच नवा श्‍वान आल्यानंतर तो दोन पोलिसांकडेच (हॅन्डलर) कायमस्वरुपी राहतो. ते पोलिसच त्याची देखभाल करतात. यामध्ये तो झोपण्यापासून ते त्याचे खाणे, ट्रेनिंग, शु, शी पर्यंत अगदी लहान मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करावा लागतो. यामुळे डॉग एकदा सेवेत दाखल झाला की तो रिटायर होईपर्यंत ते दोन्ही पोलिसच त्याची देखभाल करतात.

No comments

Powered by Blogger.