शॉर्टसर्किटमुळे शंभर एकर ऊस जळाला


कराड : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या पश्‍चिम बाजूला असलेल्या हॉटेल अरोमाच्या पाठीमागील बाजूस मुंढे (ता. कराड) गावच्या हद्दीतील माऊटी आणि माऊली नावच्या शिवारात शनिवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे पाच गावांतील 70 हून अधिक शेतकर्‍यांचा सुमारे 100 एकरांतील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या दुर्दैवी घटनेत सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांत त्याच ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे ऊस जळण्याचा हा चौथा प्रकार असूनही या गंभीर प्रश्‍नाकडे वीज कंपनीकडून दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. नुकसानभरपाई बरोबरच वीज कंपनीच्या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जळीतग्रस्त शेतकर्‍यांनी केली. मुंढे येथील शेकडो एकर क्षेत्रावरून वीज कंपनीच्या वारूंजीतील कृषी पंपांसाठीचा वीज पुरवठा व संगम पाणी योजना 11 केव्हीची व विद्युत मंडळाची 400 केव्हीची मुख्य विद्युत वाहिनी जाते. त्यामुळे या परिसरातील शेतीवर विद्युत वाहिन्यांचे जाळेच निर्माण झाले आहे. यापैकी काही ठिकाणी विद्युत वाहिन्या धोकादायक पद्धतीने अक्षरश: उसाला टेकल्या आहेत. एक वाहिनी तर तुटून पडण्याच्या स्थितीत आहे. 

अनेकदा याठिकाणी शॉर्टसर्किट झाले आहे. विद्युत वितरण कंपनीकडे याबाबत वेळोवेळी परिसरातील शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडे कानाडोळाच झाला. गतवर्षी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणात ऊस जळाला होता. यात बालमभाई भालदार हे शेतकरी जखमीही झाले होते. तेव्हा तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्‍वासन वीज अधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, वर्षानंतरही यावर कार्यवाही न झाल्याने या घटनेची शनिवारी पुनरावृत्ती झाली. दुपारी अचानकपणे शॉर्ट सर्किट होऊन उसाला आग लागली. सध्यस्थितीत ऊस तोडणीला आलेला गोटे, मुंढे, खोडशी, वनवासमाची आणि विजयनगर या पाच गावातील शेतकर्‍यांचा सुमारे 100 एकरहून अधिक ऊस जळाला आहे. जळत असलेला ऊस पहात बसण्याशिवाय हतबल शेतकर्‍यांकडे पर्यायच नव्हता. अडचण असल्याने अग्निशामक दलाचे वाहन त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकत नसल्याचा पूर्वानुभव असल्याने या घटनेत अग्निशामक दलास पाचारण केले नव्हते.

श्रीमती रशिदा मुल्ला, मुकेश जगदाळे, दाजी जमाले, बकाजी जमाले, भीमराव जमाले, दिलीप पाटील, बालमभाई भालदार, ईनायतुल्ला भालदार, अल्लुभाई भालदार, छाया लोंढे, माजी सैनिक ईस्माइल मुल्ला, चाँद मुल्ला यांच्यासह पाच गावातील 70 हून अधिक शेतकर्‍यांचा ऊस जळाला आहे. या घटनेत सुमारे दीड कोटीहून अधिक रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

No comments

Powered by Blogger.