पुणे-महाबळेश्‍वर बसचे इंजिन पेटले


भुईंज : 
सातारा -पुणे मार्गावर पुण्याहून येत असताना पुणे-महाबळेश्‍वर या खंडाळा डेपोच्या बसला कात्रज बोगद्याजवळ आग लागली. यावेळी बसच्या पाठीमागे येत असलेल्या देगाव, ता. वाई येथील योगेश चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत या रस्त्याने जात असलेली चार चाकी वाहन थांबवून त्यातील उपलब्ध साधनांच्या सहाय्याने बसला लागलेली आग आटोक्यात आणली. चव्हाण हे पुणे महानगरपालिकेत अग्निशामक दलात फायरमन म्हणून नोकरीस असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा चालक व प्रवाशांना झाला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 

बुधवारी सकाळी पुण्याहून महाबळेश्‍वरला निघालेली पारगाव खंडाळा डेपोच्या एस.टीला कात्रज बोगद्याकडे जात असताना बसच्या इंजिनमधून धूर निघू लागला. त्यामुळे चालकाने रस्त्याच्या बाजूला बस लावून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. याच दरम्यान देगाव, ता. वाई येथील योगेश चव्हाण हे दुचाकीवरून आपल्या गावी निघाले होते. बोगद्याजवळ त्यांना आग लागलेली बस दिली. त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत बसच्या इंजिनावर वाळू व मातीचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात न आल्याने त्यांनी शेजारून जाणारे वाहन थांबवले. या वाहनातील अग्निप्रतिबंधक यंत्र मागून घेऊन इंजिनाला लागलेली आग आटोक्यात आणली.

यानंतर पुणे महानगरपालिकेत फोन करून अग्निशमन दलाचे वाहन मागवले. चव्हाण यांच्या प्रसंगावधानाने 19 प्रवाशांचे प्राण वाचले. याच बसवर भिरडाचीवाडी, ता. वाई येथील चालक अंकुश शेळके हे कर्तव्य बजावत होते. चव्हाण यांनी त्यांना दिलासा देत आधार दिला व पारगाव खंडाळाच्या आगारप्रमुखांना याबाबतची माहिती दिली. योगेश चव्हाण हे रात्रपाळीचे काम उरकून आई-वडिलांना भेटण्यासाठी जात होते. मात्र, रस्त्यावर घडलेल्या या अचानक घटनेमुळे त्यांना त्यांचे कर्तव्य बजावावे लागले. यावेळी महामार्गावर थांबलेल्या वाहन मालकांनी व प्रवाशांनी चव्हाण यांच्या साहसाचे कौतुक केले.

No comments

Powered by Blogger.