Your Own Digital Platform

महालक्ष्मी महिला मंडळाच्या समुपदेशन केंद्रासाठी आर्थिक मदत करू : सौ.वनिता गोरे , सुरेंद्र गुदगे.


मायणी : कुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ व इतर समस्यांनी त्रस्त तसेच मानसिक दृष्ट्या असंतुलित महिलांच्या सामाजिक, मानसशास्त्रीय व कायदेशीर समुपदेशनासाठी महालक्ष्मी महिला मंडळ ,मायणी व जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने सुरू असलेल्या समुपदेशन केंद्राचे कार्य प्रभावीपणे सुरु असून या केंद्राला महिला बालकल्याण विभागाच्या सादिल मधून निधी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन सातारा जि.प.च्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ.वनिता गोरे यांनी केले.

जिल्हा परिषदेमध्ये महिला समुपदेशन केंद्रात आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या याप्रसंगी माजी जि. प. सदस्या शोभना गुदगे समुपदेशन केंद्राच्या अध्यक्षा प्रतिभा माळी जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे, सुषमा मोरे ,साळुंखे यांची उपस्थिती होती.

या केंद्रातून महिन्याला तीस पस्तीस कौटुंबिक वादाची प्रकरणे दाखल होतात .योग्य समुपदेशन व कायदेशीर सल्ला देऊन बहुतांश प्रकरणाचा निपटारा केला जातो. या केंद्राला १७ वर्षे पूर्ण झाली असून आज अखेर हजारो कौटुंबिक वादाची प्रकरणे या केंद्राच्या सल्ल्याने मार्गी लागली असून अनेकांचे तुटू पाहणारे संसार सावरले गेलेत.

सुरेंद्र गुदगे म्हणाले, महालक्ष्मी मंडळाने समाजप्रबोधनाच्या कार्याची व्याप्ती वाढवावी. बाल्यावस्थेपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार रुजविण्याची समाजाला गरज असून स्त्रियांप्रती आदराची भावना वाढविण्यासाठी समाजातून सर्वच स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे.

समुपदेशन केंद्रामुळेच आमचे संसार सुखाने पुनश्च सुरू झाल्याचे मनोगत लाभार्थी महिलांनी केले. अँड. बर्गे यांनी प्रास्ताविक केले.सुषमा मोरे यांनी स्वागत केले. अँड स्मिता पवार यांनी आभार मानले.