आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

कृषी पंपांना नवीन प्रणालीद्वारे कनेक्शन : बावनकुळे


सणबूर : सातारा जिल्ह्यात प्रलंबित असणार्‍या 11 हजाराहून अधिक कृषी पंपाना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे नवीन कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वीज जोडणीसाठी 170 कोटी 17 लाखाच्या विविध कामांसाठी निविदाही मागवण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.पश्‍चिम महाराष्ट्रात एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (एचव्हीडीएस) ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा मरळी येथे ना. बावनकुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. शंभूराज देसाई यांच्यासह मोरणा शिक्षण संस्थेचे रविराज देसाई, अ‍ॅड. मिलिंद पाटील, जयवंतराव शेलार, विजय पवार यांच्यासह शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातील कृषी पंपांना प्रचलित पद्धतीनूसार 63 केव्हीए - 100 केव्हीए क्षमतेच्या वितरण ट्रान्सफॉर्मरवरील लघुदाब वाहीनीव्दारे वीज पुरवठा करण्यात येतो. एका ट्रान्सफॉर्मरमधून 15 ते 20 कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो. लघुदाब वाहिनीची लांबी जास्त असल्याने वीज गळती होणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे, अतिभार झाल्यास ते नादुरूस्त होणे यासारख्या समस्यांवर या नव्या योजनेमुळे मात करणे शक्य होणार आहे.. मार्च 2018 अखेर पैसे भरून प्रलंबित राहिलेल्या 2 लाख 24 हजार 785 कृषी पंपांना या नवीन वीज जोडणी देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे ना. बावनकुळे यांनी सांगितले.

आ. शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात अनेक शेतकर्‍यांना पैसे भरूनही वीज कनेक्शन मिळत नव्हते. याबाबत शेतकरी आपल्यापुढे अडचणी मांंडत होते. त्यामुळे आपण हा मुद्दा विधिमंडळात मांडला होता. त्यानंतर आता शेतकर्‍यांना कनेक्शन मिळणार असल्याने आपण समाधारी असल्याचे आ. देसाई यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यातील शेतकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांनी मानले.