आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर खाली सापडून चालक ठार


मारूल हवेली (कराड) : शेतात रोटर मारत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली आलेला मोठा दगड न दिसल्याने ट्रॅक्टर पलटी होवून ट्रॅक्टरखाली सापडून चालक जागीच ठार झाला. संताजी सदाशिव पवार ( वय ४०, रा. नावडी वसाहत) असे या मृत चालकाचे नाव आहे. काल, बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून नावडी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसाकडून मिळालेल्या माहिती अशी की, संताजी पवार हे विहे घाटात असलेल्या शिवारात एका शेतक-याच्या शेतात रोटर मारण्यासाठी ट्रॅक्टर घेवून गेले होते. रोटर मारत असताना ट्रॅकच्या चाकाखाली मोठा दगड आला. यात ट्रॅक पलटी होवून संताजी ट्रॅकच्या चाकाखाली सापडले. त्यांच्या छातीवर ट्रॅक्टरचा दाब पडल्याने अंतर्गत रक्त स्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला. रात्री उशिरापर्यंत पवार घरी आले नसल्याने ट्रॅक्टर मालक सुजीत चव्हाण यांनी शोधाशोध केली असता हा अपघात झाला असल्याचे त्यांना समजले. 

या घटनेची माहिती धनाजी पवार यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पाटण येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.