Your Own Digital Platform

‘कमळा’बाईचा जोर; ‘घड्याळ’बाबांना घोर


सातारा : शरद पवार यांचा बालेकिल्‍ला असलेल्या सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कारस्थानात गुंग असताना महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील मात्र सातारा जिल्ह्यात भरपूर वेळ देत बालेकिल्ल्याला सुरुंग लावून फोडाफोडी करण्यात दंग आहेत. ग्रामीण भागात भाजप नेत्यांचे कार्यक्रम वाढू लागल्याने ‘कमळा’बाईंचा जोर अन् ‘घड्याळ’बाबांना घोर, अशी अवस्था ठळकपणे दिसत आहे.सातारा जिल्ह्यात लोकसभेचे सातारा व माढा हे दोन मतदारसंघ येतात. माढा मतदार संघात फलटण, माण हे पूर्णत: तर खटाव व कोरेगाव तालुका अंशत: समाविष्ट आहे. 

शरद पवारांचा बालेकिल्‍ला म्हणून सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात ओळखली जाते. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी शिरकाव केला. काँग्रेस-राष्ट्रवादीमधे तिसर्‍या फळीत असलेली अनेक मंडळी भाजपच्या तंबूत गेली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांसह भाजपनेत्यांनी त्यांना त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात ताकद दिल्याने सत्तेचा झटका प्रशासनाच्या पातळीवर दिसू लागला. राष्ट्रवादीमध्ये असताना आमदारांचे बगलबच्चे म्हणून ओळखले जाणारे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये जाऊन नेते झाले. 

आता प्रशासकीय पातळीवर एक वेळ आमदारांचे ऐकले जात नाही एवढे भाजपमध्ये गेलेल्या छोट्या कार्यकर्त्याचे ऐकले जात असल्याच्या सुरस कथा सांगितल्या जात आहेत. विशेषत: महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आपली ऊठ-बस सुरु ठेवली आहे. कार्यकर्त्याला थेट ताकद देवून त्याच्या मतदार संघात जावून जाहीर कार्यक्रम घेवून तिथल्या विरोधकावर टिकास्त्र करुन भाजपचे वातावरण तयार करण्याचे काम चंद्रकांत पाटील यांच्याकडून होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील प्रबळ जिल्हा परिषद गटात चंद्रकांत पाटील यांचे दौरे वाढले आहेत. जाता-येता कार्यकर्त्यांना वेळ देवून प्रशासनाला सूचना देवून भाजप कार्यकर्त्याला बुथ टू बुथ प्रचार यंत्रणा राबवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

वास्तविक महागाई, पेट्रोल-डिझेल - गॅसची दरवाढ, बाजारातील मंदी, बेरोजगारी असे कितीतरी विषय सत्ताधारी भाजप सरकारविरोधात विरोधी पक्षाकडे आहेत. मात्र, बालेकिल्ल्यात प्रभावी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ताधारी पक्षाविरोधात धार बोथट झाल्याचे दिसत आहे. भाजपने बुथ टू बुथ प्रचार यंत्रणेला सुरुवात केली असताना राष्ट्रवादी मात्र अजूनही जुन्याच यंत्रणेत गाफील आहे. राष्ट्रवादीची नेतेमंडळी कारस्थानांमध्ये गुंग आहेत. भाजपची तयारी केवळ लोकसभा निवडणुकीची नाही तर विधानसभा निवडणुकीच्यादिशेने दिसत असताना राष्ट्रवादी मात्र असुरी बहुमताच्या इतिहासात गाफील राहिली आहे. 

राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीला जूनमध्ये प्रदेशने मान्यता दिली आहे. मात्र, अद्यापही कुरघोड्यांच्या राजकारणात प्रदेशने मान्यता दिलेली यादी प्रसिद्धच करण्यात आलेली नाही. राज्यात सत्ताधारी पक्षाविरोधात वातावरण असल्याने त्या लाटेत आपण निवडून येवू असा अहंकार राष्ट्रवादीमधील काहींना जडला असल्याने ते जनतेला गृहीत धरु लागले आहेत. मात्र, त्याचवेळी अ‍ॅन्टीइनकंबन्सी म्हणजे एकेकाला तीन-तीन चार-चार वेळा निवडून दिल्यानंतर मतदार संघातील प्रश्‍न सुटत नसतील तर तिथे जनता पर्यायी विचार करु शकते. याचा सोयीस्कर विसर राष्ट्रवादीतील काही ठाणेदारांना पडला आहे, याकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पहावे लागणार आहे.

जसजशा निवडणुका जवळ येथील तसतसे भाजप सत्तेचा वापर करत कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या घराघरात प्रयत्न करताना दिसणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सर्व हालचाली त्या दिशेने आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकमेकांच्या पाडापाडीची कारस्थाने करण्यात गुंग राहिली तर ‘हा पवारांचा बालेकिल्‍ला होता’ असे म्हणण्याची वेळ येणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले गेल्या खेपेला 3 लाखांहून अधिक मतांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतील काही आमदारांचा या वेेळेस त्यांना विरोध आहे. केंद्रातील, राज्यातील सत्ता फसवाफसवीमुळे जाईल, असे उदयनराजेंना वाटते. त्यामुळे काही आमदारांचा विरोध असतानाही उदयनराजेंना राष्ट्रवादी सोडाविशी वाटत नाही. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर उदयनराजेंसाठी पायघड्याच अंथरल्या आहेत. मराठा समाजाचा भाजपला विरोध असल्याचे जे चित्र दिसत आहे ते फडणवीसांना बदलायचे आहे. 

त्यासाठी मराठ्यांचा छत्रपती फडणवीसांना भाजपमध्ये हवा आहे. उदयनराजे भाजपमध्ये गेले, तर फडणवीस त्यांना महाराष्ट्रभर फिरवल्याशिवाय राहणार नाहीत. उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले, तर समोर उमेदवार कोण आणि लढाई कुणाला धरून आणून करायची, असा कथित सवाल विरोधी पक्षांपुढे आहे. शरद पवार हे सर्व जाणतात. त्यामुळे आपले हक्‍काचे पान विरोधकांच्या गोटात पाठवण्याची व निवडणूक होऊ देण्याची रिस्क पवार का घेतील का? आणि बूथ एजंटांपासून सर्व पद्धतीचे इंतजाम असलेली बांधीव पार्टी सोडण्याची रिस्क उदयनराजे तरी कशाला घेतील?