Your Own Digital Platform

टाकेवाडी जलसंधारणाचा आदर्श राज्याने घ्यावा : पृथ्वीराज चव्हाण


खटाव : कायम दुष्काळात होरपळणार्‍या माण तालुक्यातील टाकेवाडी गावाने पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करुन जलसंधारण कामांचा आदर्श निर्माण केला आहे. संपूर्ण राज्याने अशीच वाटचाल करुन टंचाईवर मात करावी. आता लाखोंच्या संख्येने परिश्रम करणार्‍या श्रमादात्यांच्या परिश्रमाला निसर्गाने साथ द्यावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.टाकेवाडी, ता. माण येथे पाणी फौंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत राज्यस्तरावर चमकलेल्या गावांच्या गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. सतेज पाटील, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, डॉ.कैलास शिंदे, शांतीलाल मुथा, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अरुण गोरे, चेतना सिन्हा, प्रांत दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

आ. चव्हाण पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील जनतेला कायम पडणार्‍या दुष्काळामुळे स्थलांतर करण्याची वेळ येते. इथले लोक जिद्दी आहेत. दुष्काळाशी नेहमीच लढा देतात. मात्र, या भागात क्रांतीकारक बदल करायचा असेल तर शाश्‍वत पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. आमची साखळी सिमेंट बंधारे आणि जलस्त्रोतांच्या दुरुस्तीची योजना या सरकारने जलयुक्त शिवार या नावाने पुढे सुरु ठेवली आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, टाकेवाडीकरांनी संघटित शक्‍तीद्वारे संपूर्ण देशाला आदर्श घालून दिला आहे. दुष्काळी भागातील टंचाई दूर करण्यासाठी आम्ही बंधार्‍यांची योजना आणली होती. आता लोकसहभागातून जलसंधारण कामे होत आहेत. राज्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. सर्वांना एकजुटीने दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे.

आ. सतेज पाटील म्हणाले, पाणी फौंडेशनच्या माध्यमातून माण तालुक्यात मोठी कामे झाली आहेत. निसर्गही लवकरच श्रम दात्यांच्या परिश्रमाला साथ देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करुन डी. वाय. पाटील ट्रस्टतर्फे टाकेवाडीतील जल संधारणासाठी पाच लाखांचा धनादेश दिला.

दरम्यान, वॉटरकप विजेत्या टाकेवाडी, द्वितीय क्रमांक विजेत्या भांडवली, सिंधखेडराजा, तृतीय आनंदवाडी, उमठा, माण आणि खटाव तालुकास्तरीय विजेत्या गावांचा व जलसंधारण कामांत योगदान देणार्‍या जलदूतांचा गौरव करण्यात आला.

गेल्या वर्षी वॉटरकपच्या प्रथम क्रमांकाने हुलकावणी दिली होती. या वर्षी मात्र काहीही झाले तरी विजेतेपद खेचून आणायचेच, दुष्काळ हटवायचाच या इराद्याने आम्ही सर्वजण पेटून उठलो होतो. दोन्ही तालुक्यातील सहभागी सर्वच गावांनी खूप परिश्रम घेतले. प्रशासकीय अधिकारी, गावचे नागरीक, विविध संस्थांनी योगदान दिले. आणि जलसंधारण चळवळीला बळ मिळाले. खूप कामे झालीत. मात्र निसर्गाने अवकृपा केली आहे. जलसंधारण कामे हा अंतिम उपाय नाही. पाणीयोजना पूर्ण करणे तितकेच गरजेचे आहे, असे मत आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.