आश्रमशाळांतील निकोप वातावरणाला तडा


सातारा : कुरळप, ता.वाळवा, जि.सांगली येथील आश्रम शाळेतील मुलींवर संस्थापकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने आश्रमशाळांमधील निकोप शैक्षणिक वातावरणाला तडा गेला आहे. या घटनेने संबंधित पालकांनाही धास्ती लागून राहिली असून कुरळपच्या सुसंस्कारालाही गालबोट लागले आहे.

 यानिमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील अपप्रवृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या कुशीत वसलेल्या कुरळपमधील आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने सर्वत्रच खळबळ उडाली. असाच काहीसा प्रकार सातारा जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतही काही वर्षांपूर्वी घडला होता. त्यामुळे आश्रमशाळांमधील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

कुरळपमध्ये विविधता आहे. जिथे कुठे असू तिथे उच्चस्थानी बसू, असे या गावाचे वैशिष्ट्येे आहे. राजकारणात नेहमीच गावाचा दबदबा राहिला आहे. या गावाने नेहमीच चांगल्या शिक्षणाचा आग्रह धरला. व्याख्यानमालेच्या रुपाने प्रबोधनाची चळवळ राबवली. सहकारातून गावाचा विकास साधला. प्रशासकीय सेवेत गावाने सर्वाधिक अधिकारी दिल्याने या गावाने पोलिस उपनिरीक्षकांचे गाव म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

अशा या विविध गुणांचा समुच्चय असणारे कुरळप आश्रम शाळेतील मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे बदनाम झाले आहे. पण या वाईट प्रवृतीला वेसण घालण्याचे काम एका महिला पोलिस अधिकार्‍याने केले आहे. नराधम अरविंद पवार याने शासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरुन मोठी माया जमवली आहे. याला राजकीय पाठबळाबरोबर काही शासकीय अधिकार्‍यांचे अभय मिळाल्याने तो ‘हुकूमशाहा’ बनला होता.

अत्याचार असह्य झाल्याने अत्याचाराला बळी पडलेल्या काही मुलींनी कुरळप पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना निनावी पत्र लिहिले होते. या पत्राच्या लखोट्यावर ‘पत्र केवळ चव्हाण मॅडम यांनीच पहावे’ असा मजकूर लिहिला होता. तसेच मॅडम तुम्ही न्याय मिळवून द्या, असे म्हणत काही दिवसांपासून वस्तीगृहात लैंगिक अत्याचार होत असल्याचे नमूद केले होते. त्यातूनच या घटनेचा भांडाफोड झाला. या प्रकरणातून राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेकांची शर्यत लागली आहे. त्यातून मूळ प्रश्‍न बाजूला पडू नये, इतकीच अपेक्षा पीडित मुलींच्या कुटुंबीयांची आहे.

कुरळप पोलिस ठाण्यात निनावी पत्र येवून धडकले. लखोट्यावर ‘हे पत्र केवळ चव्हाण मॅडम यांनीच पहावे’, असा मजकूर होता. मजकूराप्रमाणे पत्र पोलिस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना मिळाले. त्यांनी त्यातील मजकूर वाचून घटनेची माहिती घेतली. घटनेतील तथ्य जाणून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विवेक पाटील यांच्याशी चर्चा केली. चव्हाण यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता. निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक कोमल पवार यांच्या मदतीने मीनाई आश्रमशाळेच्या नराधम संस्थापक अरविंद पवार व महिला कर्मचारी यांच्यावर कारवाई करत. त्यांच्या मुसक्या आवळल्या.

No comments

Powered by Blogger.