Your Own Digital Platform

लुटमारी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


सातारा : सातारा- कोरेगाव रस्त्यावर शहरालगत दुचाकीवरील युवकाला लुटमार करुन जबरी चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या अटक केलेल्या संशयितांनी चोरीची कबुली दिली आहे. एक आठवड्यापूर्वी घडलेल्या घटनेचा पोलिसांनी छडा लावत कोरेगाव तालुक्यातील तिघांच्या मुसक्या आवळल्या.गणेश शंकर माळवे (वय २०, रा.पांचागणे वर्धनगड), सचिन विजय बुधावले (वय २१, रा.पो.वर्धनगड), पवन मधुकर बुधावले (वय १९, रा.वर्धनगड सर्व ता.कोरेगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत अक्षय तानाजी जाधव (वय २४, रा.जळगाव ता.कोरेगाव) या युवकाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अक्षय जाधव हा युवक सुर्योदय कॉलेज येथील रस्त्यावर थांबला होता. यावेळी अनोळखी युवकांनी तेथे जावून तक्रारदार युवकाला चाकूचा धाक दाखवून दगडाने मारहाण केली. यावेळी संशयितांनी तक्रारदार युवकाचा मोबाईल व रोख १००० रुपये असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. चोरीच्या घटनेनंतर जखमी युवकाने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली.

या जबरी चोरीबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तीन संशयित युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. संशयितांकडे चौकशी केल्यानंतर संशयितांनी जबरी चोरीची कबुली दिली. यावेळी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरी केलेला मोबाईलही जप्त केला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नारायण सारंगकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक बी.जी.ढेकळे, पोलिस हवालदार स्वामी, भिसे, मुल्ला, भोसले, कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.