रेल्वे प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचे लवकरच तीव्र आंदोलन


कराड : सध्यस्थितीत पुणे - मिरज - लोढा या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना शेतकऱ्यांवर अन्याय करत रेल्वे प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडे पूर्वी केलेल्या संपादनाची कागदपत्रे मागितली जात आहेत. मात्र ती दाखवण्यास रेल्वेचे अधिकारी स्पष्टपणे नकार देत आहेत. याशिवाय भूमिअभिलेख कार्यालयाला हाताशी धरून खोटे रेकॉर्ड तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत रेल्वे व भूमिअभिलेख कार्यालयातील संगनमताविरूद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या दहा ते बारा दिवसात तीव्र आंदोलन करणार, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तसेच कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कराडमधील शासकीय विश्रामगृहात संयुक्त पत्रकार परिषद घेत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ठेकेदाराने काही शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस बेकायदेशीरपणे तोडला आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी मुरूम टाकून मोठ्या प्रमाणावर शेतीचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. पूर्वी जमिनीच संपादित न करता शेतकऱ्यांना मोबदला दिला नव्हता. त्यामुळे रेल्वेकडे कागदपत्रे येणार कोठून ? असा प्रश्न उपस्थित करत अन्यायाविरूद्ध तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सचिन नलवडे, रामचंद्र माने, विकास थोरात यांच्यासह कोपर्डे हवेली, तारगाव, कालगावसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.


No comments

Powered by Blogger.