'स्वाभिमानी'ने ऊस तोडीसह वाहतूक रोखली


कराड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी रविवारी कराडात पडली. खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिल्या हप्त्याची घोषणा न करता ऊस तोड व वाहतूक सुरू करण्यात आल्याने बनवडी (ता. कराड) येथे रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी ऊस तोड थांबवत ऊस वाहतूक बंद पाडली. सोमवारपासून ऊस तोड व वाहतूक सुरू ठेवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही सचिन नलवडे यांनी यावेळी दिला आहे.

खासदार शेट्टी यांनी जयसिंगपूर (कोल्हापूर) येथील ऊस परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे साखर कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर करावा आणि त्यानंतरच ऊस तोडणी सुरू करावी, असा इशारा सचिन नलवडे यांच्यासह स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळीच दिला होता. मात्र त्यानंतर सांगली जिल्ह्यातील एका कारखान्याकडून बनवडी परिसरात ऊस तोडणी सुरू करण्यात आली होती. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच सचिन नलवडे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत ऊस तोड बंंद पाडली. तसेच ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरही काहीकाळ अडवून ठेवला होता. सात वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी अडवलेला ट्रॅक्टर सोडून देण्यात आला. मात्र सोमवारपासून असे केले जाणार नाही, हे लक्षात ठेवण्याचा इशारा नलवडे यांनी यावेळी दिला आहे.

No comments

Powered by Blogger.