बेकायदा बांधकामे पाडण्याबाबत फतवा


पाचगणी : महाबळेश्‍वर व पाचगणी या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात बांधकामावर नियंत्रण ठेवण्याकरिता कार्यरत असलेल्या उच्च संनियंत्रण समितीने बेकायदा बांधकामे पाडण्याचा फतवा काढला असून पोलिस संरक्षणात बेकायदा बांधकामे पाडण्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. दरम्यान, उच्च संनियंत्रण समितीने बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश तब्बल 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच काढला असला तरी कारवाईचा हा केवळ फार्सच ठरू नये, असे बोलले जात आहे. 

धनदांडग्यांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई होणार का, असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे . पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या महाबळेश्‍वर तालुक्यात पर्यावरणाला बाधा आणून नेतेमंडळींना हाताशी धरुन महाबळेश्‍वर तालुक्यात धनदांडग्यांकडून बेकायदेशीरपणे बांधकामे करुन इमल्यावर इमले उभे करण्यात आले. उच्च सनियंत्रण समितीकडे तक्रारी करुनदेखील त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. मात्र, सर्वसामान्यांच्या बांधकामांवर कारवाईचा तातडीने बडगा उगारला जातो.

महाबळेश्‍वर तालुक्यातील पर्यावरणप्रेमींनी धनदांडग्यांच्या अनाधिकृत बांधकाम व बेकायदा वृक्षतोडीविरोधात तक्रारी करुन देखील त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. उच्च सनियंत्रन समितीकडून अद्याप एकाही धनदांडग्यांचे बेकायदा बांधकाम पाडण्याचा आदेश घेतला नाही.

एकीकडे सर्वसामान्यांची बांधकामे पाडण्याकरीता प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु असताना धनदांडग्यांच्या बेकायदा बांधकामांना अभय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सर्वसामान्य नागरिक व स्थानिकांनी महाबळेश्‍वर तालुक्याचे पर्यावरण अबाधित ठेवण्याकरता मोलाचं योगदान आजपर्यंत दिले आहे तर धनदांडग्यांनी राजरोसपणे प्रशासनातील जंत हाताशी धरत बेकायदा बांधकामे उभी केली आहेत. उच्च सनियंत्रण समितीने धनदांडग्यांच्या बेकायदा बांधकामांना अभय दिले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

महाबळेश्‍वर व पाचगणीत कार्यरत असलेल्या उच्च संनियंत्रण समितीची स्थापना झाल्यापासून महाबळेश्‍वर तालुक्यात बेकायदा बांधकामाचा जोर वाढला, तर दुसरीकडे बेकायदा वृक्षतोडीचे प्रमाणही वाढले. मात्र, गत वर्षापासून कार्यरत असलेल्या उच्च संनियंत्रण समितीने फक्‍त ‘बोलाची कढी व बोलाचा भात’ करत कोणतीही ठोस कारवाई न केल्याने महाबळेश्‍वर तालुक्यात धनदांडग्यांनी राजकीय दलालाकरवी बेकायदा बांधकामांचा डोंगरच उभा केला आहे.

No comments

Powered by Blogger.