फ्लॅट सोडण्यासाठी महिला पोलिसाला खंडणीची मागणी


सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस राणी विष्णू मोहिते (वय 31, रा.रविवार पेठ) यांच्याकडे 7 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फ्लॅटच्या प्रकरणातून हा प्रकार घडला असून महिला पोलिसालाच दमदाटी, शिवीगाळ झाली आहे.

महारुद्र कानडे व त्याची पत्नी धनश्री कानडे (दोघे रा.साईपुष्प अपार्टमेंट, रविवार पेठ) या दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेे. याबाबत अधिक माहिती अशी, महिला पोलिस राणी मोहिते यांनी केसरकर पेठेत फ्लॅट विकत घेतला आहेे. पोलिस वसाहतीमध्ये रुम राहण्यासाठी मिळाल्याने तो फ्लॅट भाड्याने कानडे कुटुंबियांना दिला. 25 ऑक्टोबर रोजी मोहिते यांनी कानडे यांना फ्लॅट सोडून जाण्यासाठी सांगितले. मात्र कानडे दाम्पत्याने फ्लॅट सोडून जाण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी केली. 

महिला पोलिसाने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या महारुद्र कानडे याने त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली. अखेर महिला पोलिसाने शहर पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कानडे दाम्पत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला.

No comments

Powered by Blogger.