वाई तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेला आग
ओझर्डे : वाईच्या तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेला शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये बरीच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली तर २५ हजार नवीन शिधापत्रिका मात्र यातून वाचल्या आहेत.शनिवारी सकाळी पुरवठा शाखेच्या एका खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला ही आग छोट्या स्वरूपात होती. मात्र कागदपत्रांना लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते.
सात वाजेपर्यंत या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी वाई आणि पाचगणी येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. यानंतर काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात आले. मात्र यामध्ये बरीच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने नवीन काढण्यात आलेल्या २५ हजार शिधापत्रिका दुसऱ्या एका खोलीत असल्यामुळे त्या जळल्या नाहीत. यानंतर प्रांताधिकारी संगीता राजापुरकर चौगुले तहसीलदार रमेश शेडगे व सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
Post a Comment