आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

शरद पवार यशवंतनीती वापरणार कि राजेंच्या ताब्यात सातारा लोकसभा देणार?


स्थैर्य, सातारा (चैतन्य रुद्रभटे): लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असणार्‍या सातारा जिल्ह्यातील निवडणुकीत यंदा रंगत येणार आहे. सातारा लोकसभा मतदार संघाच्या आगामी काळातील राजकारणाची गणिते राष्ट्रवादीचे सुप्रिमो खासदार शरद पवार यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे एकंदर चित्र दिसत आहे. खासदार शरद पवार यशवंतनिती अवलंबत सर्वसामान्य उमेदवार पुढे आणणार की एखाद्या राजघराण्याला उमेदवारी बहाल करणार? हे येणार्‍या काळात दिसून येईल. मात्र, यावरच सातारा लोकसभा मतदार संघाची सर्व गणिते अवलंबून असतील, असेही सांगितले जात आहे.

शिवेंद्रसिंहराजे वचपा काढण्याच्या तयारीत
भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या म्हणजेच यशवंतराव चव्हाणांचे वारसदार मानल्या जाणार्‍या माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या पाठीशी कायम ठाम उभा राहिला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून गत निवडणुकीत आलेल्या मोदीलाटेपर्यंत राष्ट्रवादी र्कॉग्रेस पार्टीला येथील नेतेमंडळींनी साथ दिली. मात्र, सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पराभव खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गटाने केल्यामुळे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे हे खासदारांचा वचपा काढण्यासाठी आक्रमक झालेले आहेत, असे सांगितले जाते. मध्यंतरी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदारांनी थोड्याबहुत प्रमाणावर वचपा काढलाच, असे म्हणण्यास हरकत नाही.

उदयनराजेंच्या मते, रामराजे मास्टरमाईंड?
आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबरच महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फारसे पटते, असे वाटत नाही. लोणंद (ता. खंडाळा) येथील सोना अलाईज या कंपनीने खासदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल करण्यामागे ना. श्रीमंत रामराजे यांचा पुढाकार होता, असा आरोप खासदार गटाकडून केला जात आहे. त्यानंतर खासदारांनी ना. श्रीमंत रामराजेंच्या फलटण तालुक्यात येवून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे सुशांत निंबाळकर या विरोधी गटाला बरोबर घेत ना. श्रीमंत रामराजेंना शह देण्याचा प्रयत्न अनेकदा केला.

उदयनराजे व राष्ट्रवादीतील
दिग्गज नेत्यांतील सख्य सर्वांना ठावूक


राष्ट्रवादीतील इतर दिग्गज नेतेमंडळीशीही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फारसे पटले, असे दिसले नाही. माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार व खासदारांचे असलेले सख्य सार्‍या जिल्ह्याला ज्ञात आहे. यामुळे अजितदादांचे कट्टर समर्थक असणार्‍या आमदार शशिकांत शिंदेंनाही विद्यमान खासदार कितपत आवडत असतील, यात शंका आहे. एव्हाना कोरेगाव तालुक्यात जावून विद्यमान खासदारांनी नुकताच आमदार शशिकांत शिंदेंच्या विरोधात दंड थोपटण्याचा प्रकार केला असल्याचे सांगितले जाते.

शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे
राजे-महाराजेंसाठी धोक्याची घंटा?


स्व. यशवंतराव चव्हाणांनी राजे-महाराजेंना आपल्या राजकारणात फारसे स्थान दिले नाही. ठिकठिकाणी असणार्‍या राजे-महाराजेंची संस्थाने खालसा करुन सर्वसामान्य जनतेतील उमेदवार पुढे आणण्यावर स्व. यशवंतराव चव्हाणांनी भर दिला. नव्वदच्या दशकात किंबहुना त्या सुमारास सर्वच राजे महाराजे पुन्हा राजकारणात सक्रीय होत गेले व आपआपल्या भागात आपले राज्य म्हणजेच सत्ता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले. याच्या जोरावर जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा बँक या जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाच्या संस्थांवर पुन्हा एकदा सर्व राजे एकत्र आले. यामुळे स्व. यशवंतरावांचा वारसा व विचार पुढे चालवणार्‍या शरद पवारांनाही राजे-महाराजेंशिवाय इतर पर्याय दिसला नाही. परिणामी पवारांनी राजेंना कधी डावलले नाही आणि राजेंनीही जुनी आठवण कायम ठेवत पवारांना नेता मानण्यात धन्यता मानली. पण, मध्यंतरी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार सातार्‍यात आल्यानंतर भाकरी करपायला अजून आम्ही तव्यापर्यंतच गेलो नाही, असे म्हणत सातारा लोकसभा मतदार संघातील स्वकियांच्या या वावटळावर बोलणे टाळणे होते. मात्र, त्याच शरद पवारांनी पुण्यात सर्वच राजे-महाराजेंच्या बेताल वागणुकीवर वक्तव्य केले होते. शरद पवार यांचे सर्व राजेंच्या विरोधातील वक्तव्य म्हणजे ही राजे-महाराजेंसाठी धोक्याची घंटा आहे का? असा सवाल निश्‍चितच उपस्थित करावा लागेल.

लोकसभेचे सत्ताकेंद्र राजेंच्या ताब्यात राहणार का?
सातारा जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या घरातच विरोधी व सत्तेची खुर्ची आहे. सातार्‍यात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व त्यांचे चुलत बंधू श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात म्हणजेच दोन भोसलेंच्या घरातच सत्ता संघर्ष आहे. फलटण तालुक्यात ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्यात म्हणजे दोन निंबाळकरांच्यात सत्ता संघर्ष आहे. माण तालुक्यात आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्यात सत्ता संघर्ष आहे. सातारा जिल्ह्यात लोकसभा मतदार संघात सध्या ना. श्रीमंत रामराजे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांचा व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याशी संघर्ष सुरु आहे. आता, आगामी काळात शरद पवार कोणाला उमेदवारी देतात यावर सातारा लोकसभा मतदार संघाच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

तर, दोन राजेंच्या चक्रव्युहात
लोकसभा मतदार संघ गुरफटेल


सातारा लोकसभा मतदार संघाची उमेदवारी शरद पवारांकडून मिळवण्यास ना. श्रीमंत रामराजेंना यश आल्यास आगामी काळातील राजकारण राजेंच्या भोवती फिरणारे दिसेल. विद्यमान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे विरुद्ध ना. श्रीमंत रामराजे या दोहोंच्या चक्रव्ह्युहात सातारा लोकसभा मतदार संघ व येथील नेतेमंडळी गुरफटून जातील, यात शंका नाही.