सातारच्या मातीत कबड्डीपटूंची वानवा


सातारा : ग्लॅमरचा तडका असलेल्या बहुचर्चित प्रो-कबड्डी लीगच्या 6 व्या सत्रास दणक्यात प्रारंभ झाला आहे. भारतासह सुमारे 14 देशातील खेळाडूंचा सहभाग असलेल्या या लीगमध्ये मात्र सातारा जिल्हा पिछाडीवर पडला आहे. पैलवानी मातीतील खेळाडू कबड्डीत मागे आहेत का?, असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.या लीगमध्ये सातारा जिल्ह्याची पाटी कोरी आहे. सोयी-सुविधांचा अभाव व आर्थिक पाठबळ नसल्याने दर्जेदार खेळाडू कबड्डी खेळातून बाहेर पडत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील उद्योजकांचे पाठबळ मिळाले तर आगामी काळात या लीगमध्ये सातारा जिल्ह्यातील खेळाडू पाहण्याची संधी जिल्हावासियांना मिळणार आहे.

क्रिकेटला जास्त ग्लॅमर असून इतर खेळ फारच मागे पडल्याची वारंवार चर्चा होत असते. गतवर्षाची आकडेवारी पाहता आईपीएलनंतर सर्वात जास्त प्रेक्षक लाभलेली टूर्नामेंट म्हणून प्रो-कबड्डी लीग ओळखली जाते. आईपीएल प्रमाणेच कबड्डी खेळाडूंची बोली लावली जात असून भारतीय कबड्डी टीमचा कॅप्टन अजय ठाकूर याला तब्बल 50 लाख रुपयेहुन अधिक किंमत मिळाली आहे. परदेशी खेळाडूंना अगदी 25 लाखापर्यंतची किंमत मिळाली आहे. सिनेअभिनेते व बिझनेसमन कबड्डीची टिम खरेदी करत असल्याने कबड्डी खेळाडूंनातरी ‘अच्छे दिन’ आले म्हणण्यास हरकत नाही. परंतु यामध्ये सुमारे 30 लाख लोकसंख्या असलेल्या सातारा जिल्ह्यातील एकाही खेळाडूंचा सहभाग नसल्याने जिल्हावासियांच्या मनाला ही बाब चटका लावणारी ठरत आहे.

शासनाची उदासिनता, उद्योजकांचे पाठबळ मिळत नसल्याने जिल्ह्यातील कबड्डीला व्यावसायिक स्वरुप येईनासे झाले आहे. कबड्डी खेळातून ‘ना नोकरीची हमी, ना आर्थिक सोर्स’ अशा विदारक अवस्थेमुळे अनेक गुणवत्ता असलेल्या खेळाडूंनी कबड्डी खेळ सोडून दिला आहे. तर आयोजित करण्यात येणार्‍या विविध शिबीरामध्ये मुलांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. जिल्ह्यात मुला-मुलींचे कबड्डीचे सुमारे 10-15 संघ आहेत. कबड्डी खेळातही दिवसेंदिवस आमुलाग्र बदल झाले आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व व्यावसायिक स्पर्धा आता मॅटवर खेळल्या जातात. मात्र जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू खुल्या मैदानावरच सराव करतात. प्रॅक्टीससाठी किमान संघाएवढ्यात मॅटची गरज असताना जिल्ह्यात कबड्डीसाठी काही मोजक्या संघाकडेच मॅट उपलब्ध आहे. स्पर्धा मॅटवर आणि सराव मातीत असल्याने खेळाडूकडून अपेक्षीत खेळ होत नाही. याचाच परिणाम म्हणून गतवर्षी सातारा कबड्डी संघ महाराष्ट्र राज्य निवड चाचणीमध्ये गटातच बाद झाला होता.

अनेक गुणवान मुले व मुली ठराविक स्टेजनंतर आर्थिक स्थिरतेसाठी नोकरीच्या माध्यमातून खेळातून बाहेर पडतात. स्थानिक उद्योजक, बँका, लोकप्रतिनिधी आदींनी खेळाडूंना दत्तक घेवून आर्थिक पाठबळ उभे केले तर सातार्‍यातील खेळाडूही प्रो-कबड्डी लीग सारख्या ग्लॅमर असलेल्या व्यावसायिक स्पर्धेमधून खेळताना दिसतील.

सन 1975-85 च्या काळात सातार्‍याचा कबड्डीमध्ये दबदबा होता. हनुमान उडीसाठी प्रसिद्ध असलेले कबड्डी खेळाडू डॉ. नरेंद्र दाभोलकर, विजय जाधव, कुमार कुलकर्णी यांच्यासह अनेक खेळाडूंनी अनेक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धांची विजेतेपदक पटकावली होती. तसेच जिल्ह्यातील खेळाडूने महाराष्ट्र वरिष्ठ संघाचे कर्णधारपदही भूषवले होते. असा दैदिप्यमान इतिहास असलेल्या सातारा जिल्ह्यातील एकही खेळाडू प्रो-कबड्डी लीगमध्ये समाविष्ठ नसल्याची खंत अनेक माजी खेळाडूंना वाटत आहे.

No comments

Powered by Blogger.