जुना मोटर स्टॅन्डवर उदयनराजे-शिवेंद्रराजे समोरासमोरसातारा : येथील जुना मोटार स्टॅन्ड परिसरात पोलीस बंदोबबस्तात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु असताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.

सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास जुना मोटार स्टँड परिसरातील अतिक्रमण काढणे सुरु होते. यावेळी अतिक्रमण पाडण्याबाबत कायदेशीर कागदपत्राची मागणी करण्यात आली. याविषयीची माहिती समजल्यानंतर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे येथे पोहोचले आणि कायदेशीर बाबी पूर्ण असल्याची खात्री करण्यासाठी कागदपत्रांची मागणी केली.

जोपर्यंत न्यायालयाचे आदेश प्राप्त होत नाहीत तोवर अतिक्रमण काढू न देण्याचा पवित्रा आमदार  श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतला. या घटनेची माहिती समजल्यानंतर लगेचच खासदार उदयनराजे भोसलेही तिथे पोहोचले. अतिक्रमण काढण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी याविषयीची माहिती कळविल्यानंतर तातडीने तिथं जादा कुमक दाखल झाली. त्यामुळे दोन्ही राजे फक्त समोरासमोर आले, त्यांच्यात कोणतीच शाब्दिक चकमक उडाली नाही.

तणावाची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही राजेंना जाण्याची विनंती केली. त्यावेळी आधी कोण जाणार, यावरून पुन्हा ताण वाढला. आधी त्यांना जायला सांगा, अशी आक्रमक भूमिका दोघांनीही घेतल्याने पोलिसांनी विनंती करून जाण्यास सांगितले.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी गाडी थोडी पुढे नेऊन थांबवली. खासदार उदयनराजे यांची गाडी पुढे गेली नसल्याचे पाहून त्यांनी गाडी रस्त्यातच उभी केली. थोड्या तणावानंतर आमदारांची गाडी खालच्या रस्त्याला तर खासदारांची गाडी प्रतापगंज पेठेकडील रस्त्याला लागली.

No comments

Powered by Blogger.