सौर वाहिनीतून साडेसहा लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी : ऊर्जामंत्री


सातारा - सणबूर : पश्चिम महाराष्ट्रात वीज गळतीचे प्रमाण खूप कमी असून थकबाकीचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती पंपांना मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेतून सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील साडेसहा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार आहे, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते सातारा मधील मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई उपस्थित होते.ते म्हणाले, राज्यात एकूण ४४ लाख शेतकऱ्यांपैकी २२ लाख शेतकऱ्यांना दिवसा तर २२ लाख शेतकऱ्यांच्या शेती पंपांना रात्रीचा वीजपुरवठा केला जातो. 

राज्यातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात वीज बिल थकबाकी आणि वीज गळतीचे प्रमाण खूप कमी असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पंपासाठी आता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना येत्या पाच वर्षात गावोगावी या योजनेतून प्रकल्प उभारून सहा रुपये ऐवजी केवळ २ रुपये ६० पैसे या दराने दिवसा वीजपुरवठा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बावनकुळे म्हणाले, महावितरण कंपनीला देखभाल दुरुस्तीसाठी आर्थिक निधी गरजेचा असल्याने राज्यातील थकबाकीदार शेतकरी आणि वीज ग्राहक यांनी किमान ३० टक्के तरी थकबाकी भरणे आवश्यक आहे, अन्यथा महावितरण आर्थिक अडचणीत येऊ शकते याकरिता थकबाकीदार शेतकऱ्यानी आपली थकबाकी भरावी, असे आवाहन ही बावनकुळे यांनी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना यावेळी केले.

No comments

Powered by Blogger.