सातारा जेलमध्ये संशयिताकडे सापडला मोबाईल


सातारा : सातारा जिल्हा कारागृहात संशयित आरोपी आजमीर अकबर मुल्ला (रा.नागठाणे, ता. सातारा) याच्याकडेे दोन सिमकार्डसह मोबाईल सापडला. सिव्हील हॉस्पिटलमधील प्रिझन वॉर्डमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कारागृहात नेत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे सिव्हील प्रिझन वॉर्डबाहेरील पोलिसांचा बंदोबस्त पुन्हा एकदा संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे.आजमीर मुल्ला याला अपहरण व खंडणीप्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची सातारा जेलमध्ये रवानगी करण्यात आली. जेलमध्ये त्याची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी सिव्हीलमधील प्रिझन वॉर्डमध्ये दाखल केले होते. शुक्रवारी त्याला डिस्जार्ज झाल्यानंतर पुन्हा कारागृहात नेण्यात आले.

आजमीर मुल्ला याला कारागृहात नेत असताना त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे मोबाईल सापडला. त्यानुसार कारागृहचे पोलिस कर्मचारी ललितकुमार पांडुरंग पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, आजमीर मुल्ला याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यासह कराड, इस्लामपूर, सांगली, बंगळूर येथेही विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापर्यंत मोबाईल कसा व कोणाच्या आशीर्वादाने गेला? असा सवाल उपस्थित झाला आहे.

No comments

Powered by Blogger.