स्वच्छतेकडून समृद्धीकडे


कराड : स्वच्छतेकडून समृध्दीकडे वाटचाल करणार्‍या मलकापूर नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर झाल्यानंतर गांधी जयंतीनिमित्त उद्या मंगळवार दि. 2 ऑक्टोबर रोजी शहरातून स्वच्छता महारॅली काढण्यात येणार आहे. मलकापूरने आतापर्यंत स्वच्छतेबाबत खूप काम केले असून ‘स्वच्छता हीच सेवा’ असा नारा देत संपुर्ण शहर स्वच्छ, सुंदर, हरित, सुरक्षित व आरोग्यदायी शहर बनविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 

2018 मध्ये स्वच्छता मोहिम राबविताना ज्या बाबींमध्ये मलकापूर पिछाडीवर राहिले त्याचा विचार करून यंदा नव्याने त्यावर काम करून मलकापूरला स्वच्छता स्पर्धेत आघाडीवर आणण्यासाठी पदाधिकार्‍यांसह नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी नव्या जोमाने कामासA सुरुवात केली आहे. 24 बाय 7 नळ पाणी पुरवठा योजनेप्रमाणेच स्वच्छतेबाबत मलकापूरचा झेंडा देशात फडकविण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली असून प्रयत्न सुरु केले आहेत.मलकापूर शहरात दरवर्षी गांधी जयंतीपासून स्वच्छता मोहिम वेगाने राबविली जाते. 

यंदा शहर स्वच्छ करण्याबरोबरच शासनाने घालून दिलेल्या स्वच्छता निकषांच्या आधारे स्वच्छतेमध्ये काम करण्यावर पदाधिकार्‍यासंह अधिकार्‍यांचा भर असणार आहे. त्यातूनच शहरात स्वच्छता दिंडी तसेच स्वच्छतेविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दोन वर्षापर्वी हागणदारीमुक्‍त झालेल्या मलकापूरने त्यामध्ये सातत्य राखत विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे.

मलकापूर शहर 24 बाय 7 नळ पाणी पुरवठा योजनेमुळे नावारुपास आले तसेच ते स्वच्छतेच्या बाबतीमध्येही आपला वेगळा ठसा उमटवेल, असे सध्या शहरात सुरु असलेल्या विविध उपक्रमांवरून दिसून येते. ‘स्वच्छतेसाठी घेऊया एकच वसा, मलकापूरच्या प्रगतीचा उमटवू ठसा’ असा संकल्प करून पदाधिकार्‍यांसह अधिकारी कामाला लागले आहेत. मलकापूर नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर झाल्याने व यासाठी उभारलेल्या लढ्याला यश आल्याने नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षी मलकापूरचा स्वच्छतेमध्ये देशभर नाव व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

मलकापूर नगरपरिषदेने ‘स्वच्छता ही सेवा’ मानून स्वच्छतेची मोहिम सुरु ठेवली आहे. या मोहिमेंतर्गत शहराच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून नागरिकांचे प्रबोधन करण्यावरही भर दिला आहे. त्यानुसार स्वच्छता मंच स्थापन करून प्रभागनिहाय बैठका घेवून स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले जात आहे. याचाच एक भाग म्हणून नगरपंचायतीने ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पामुळे शहरातून गोळा केल्या जाणार्‍या दोन टन ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावली जाते. या प्रकल्पामधून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार केले जात आहे. यामुळे नगरपंचायतीच्या उत्पन्नात भर पडत आहे. त्यामुळे हा प्रकल्प घनकचरा प्रकल्प नव्हेतर कचर्‍यापासून धन निर्मीण करणारा प्रकल्प आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. नगरपंचायतीच्या प्रगतीमधील घनकचरा प्रकल्प हा पुढील टप्पा मानला जात आहे.

No comments

Powered by Blogger.