तुम्हाला आमदार केलं आता सेनेचा आमदार करा


मेढा : ज्या पक्षानं आमदार केलं त्या पक्षाला आमदार देणं आता तुमचं काम आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश करणार्‍या शिवसैनिकांनी मनात खेद बाळगू नये. तुम्ही पुन्हा स्वतःच्याच घरात आलेला आहात. सातार्‍यात लवकरच मोठी सभा घेऊन सातार्‍यात पुन्हा भगवं वादळ निर्माण करणार, असा विश्‍वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.शनिवारी मातोश्री येथे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी जावलीच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेमध्ये पुन्हा जाहीर प्रवेश केला. यावेळी खा. विनायक राऊत, कृष्णा खोरे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील, माजी आमदार दगडू सपकाळ, जिल्हा प्रमुख हर्षल कदम, जिल्हा नियोजन समिती सदस्य एकनाथ ओंबळे, नरेंद्र पाटील यांच्यासह सातारा व जावली येथील शिवसैनिक उपस्थित होते. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रात जावली तालुक्याला शिवसेनेने पहिला आमदार दिला. हे मी कधीच विसरलो नाही. तुम्ही पुन्हा तुमच्या स्वतःच्या घरी आला आहात. यापूर्वी तुम्ही शिवसेना सोडली पुन्हा परत आला याची खंत बाळगू नका. यापुढे फक्त शिवसेना सोडून कोठे जाऊ नका. तुम्हाला ज्या पक्षाने आमदार केले आहे त्या पक्षाला तुम्ही आता आमदार देण्याची वेळ आली आहे. 

 त्यामुळे आता आगामी विधानसभेच्या तयारीला लागा. सातारा-विधानसभा मतदारसंघात लवकरच जाहीर सभा घेणार आहे. आता संपूर्ण तालुका नव्हे तर सातारा जिल्हा भगवामय करा, असे आवाहन ही ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. यावेळी सदाशिव सपकाळ म्हणाले, ज्या पक्षाने मला आमदार केले त्या पक्षाचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. मी पुन्हा माझ्या घरी परत आलोय. मला शिवसेनेचे कोणतेही पद नको मला पक्षाची सेवा करण्याची संधी द्या. यापुढे जावलीसह जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करणार आहे.

No comments

Powered by Blogger.