सातार्‍यात दिवाळीची लगीनघाई सुरू


सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात दिवाळीची लगीनघाई सुरू झाली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली असून नागरिकही खरेदीसाठी आता बाहेर पडू लागले आहेत. अवघ्या 6 दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने घरोघरी तयारीला वेग आला आहे. बच्चेकंपनीची आवडते आणि भेटवस्तू म्हणून फेमस असलेल्या चॉकलेटस् ड्रायफ्रुटस् आणि मिठाईचे रंगीबेरंगी बॉक्सची उलाढाल वाढली आहे. या बॉक्सच्या पॅकेजिंगला आता वेग आला आहे. दिवाळी भेट म्हणून चॉकलेट ड्रायफ्रूट आणि मिठाई देण्याची प्रथा आहे. दिवाळी तोंडावर आल्याने बाजारपेठ गजबजली असून खरेदीसाठी झुंबड उडू लागली आहे. दीपोत्सव म्हणजे हर्षोल्हास आणि आनंद. एकमेकांना आनंदाची देवाण-घेवाण करताना तोंड गोड करण्याची प्रथा आहे. यासाठी दिवाळीत भेटवस्तू सोबतच ड्रायफ्रूट बॉक्स, चॉकलेट बॉक्स आणि मिठाई देण्याची प्रथा रुजली आहे. दिवाळीच्या या भेटवस्तूंच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते.

सणाला एकमेकांना शुभेच्छा संदेश देणारी भेटकार्ड देण्याचा जमाना खूप मागे राहिला आहे. आता सोशल मीडियामुळे जग अधिक जवळ आले आहे. एका क्लिकवर आपल्या शुभेच्छा आप्त-स्वकियांना देणे शक्य झाले आहे. भेट देण्याबरोबरच व्यावसायिक दिवाळी ही केवळ शुभेच्छा संदेश देऊन थांबत नाही. उद्योग व्यवसायातील सलोखा कायम राखण्यासाठी दिवाळीला भेटवस्तू दिल्या जातात. सध्या बाजारात दिवाळी गिफ्ट देण्यासाठी साजेशा अनेक वस्तू दाखल झाल्या आहेत. यामध्ये अगदी गृहोपयोगी वस्तूंपासून क्रॉकरी, बॅग्ज व अन्य वस्तूंचा समावेश आहे. भेटवस्तूंसोबत सर्वाधिक खरेदी ड्रायफ्रूट बॉक्सची होते. हेल्दी-वेल्दी शुभेच्छांचा गिफ्ट बॉक्स म्हणून ड्रायफ्रुटला अधिक पसंती दिली जात आहे. दिवाळीत मिठाईही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

दिवाळीच्या बाजारपेठेतील हा एक महत्त्वाचा भाग असून यात लाखोंची उलाढाल होते. दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा अशी म्हण आहे. याला साजेशे वातावरण सध्या बाजारपेठेत दिसत आहे.

No comments

Powered by Blogger.