माणदेशी व्यथेने मास्टर ब्लास्टर भावुक


म्हसवड : 35 वर्षांपूर्वी माजी आमदार स्व. धोंडीराम वाघमारे लिखित माणदेशातील माणसांची दारुण व्यथा मांडलेल्या ‘हुंदका’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे वडील स्व. रमेश तेंडुलकर यांच्या हस्ते झाले होते. याच काव्यसंग्रहाची एक प्रत धोंडीराम वाघमारे यांचा मुलगा अभय वाघमारे यांनी सचिन तेंडुलकर यांना भेट म्हणून दिल्यानंतर आजही दुष्काळग्रस्त माणदेशी माणसांच्या जीवनात काहीच फरक पडलेला दिसत नसल्याचे ऐकून सचिन तेंडुलकर भावूक होऊन त्याने माणदेशाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.दुष्काळग्रस्त माणदेशातील माणसांची दारुण व्यथा मांडलेला हुंदका या कवितासंग्रहाचे प्रकाशन 1983 मध्ये रमेश तेंडुलकर यांच्या हस्ते झाले होते. या काव्यसंग्रहाला कविवर्य नारायण सुर्वे यांनी प्रस्तावना दिली होती. या प्रकाशन सोहळ्यास माजी आमदार स्व. सदाशिवराव पोळ, माजी मंत्री दयानंद म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते.

धोंडीराम वाघमारे यांचा मुलगा अभय हा टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असून त्याच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील संघाला विजेतेपद मिळाले.विजयी संघातील क्रिकेटर्सचा सत्कार सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभय वाघमारे यांनी सचिन तेंडुलकर यांना काव्यसंग्रहाची भेट दिल्यावर सचिन तेंडुलकरने त्यातील काही छायाचित्रे पाहून म्हणाला, हे तर माझे बाबा आहेत. हा फोटो तुझ्याकडे कसा? असे विचारत सचिन तेंडुलकर यांनी अभयकडून अधिक माहिती जाणून घेतली.

35 वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त माणदेशातील माणसांची दारूण व्यथा या संग्रहात मांडली आहे. एका कवितेच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर यांना माणदेशाची अवस्था कळली. ही अवस्था ऐकून मास्टर ब्लास्टर भावुक झाला व त्यानंतर त्याने अभयशी बोलताना माणदेशला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

No comments

Powered by Blogger.