दुष्काळ जाहीर न करणारे सरकार हटवा : अजित पवार


कोरेगाव : ज्या सरकारने मोठा गाजावाजा करत जलयुक्त शिवार योजना आणली, तेथेच आज पाण्याचे टँकर सुरू आहेत. राज्यात दुष्काळ पडला असून, सरकारला त्याचे सोयरसूतक राहिले नाही. एकीकडे शेजारच्या कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री वेळ न दवडता दुष्काळ जाहीर करतात तर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, म्हणतात. केंद्राचे पथक पाहून गेल्यावर निर्णय होईल. दुष्काळाबाबत निकष बदलले आहेत. पीक पैसेवारीलाच वगळले आहे. हे सरकार दळभद्री असून, ते हटविण्यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी केले. दरम्यान, विराट मेळावा भरवून आ. शशिकांत शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळातील मुख्य प्रतोद व माथाडी कामगार नेते आ. शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील डी. पी. कॉलेजसमोरील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत आ. पवार बोलत होते. व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा लोकसभा मतदार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सौ. वैशाली शिंदे, साहिल शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आ. अजितदादा पवार पुढे म्हणाले की, प्रचंड जाहिरातबाजी करुन सत्तेवर आलेल्या सरकारने जनतेची भालवण केली आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा प्रघात सरकारने पाडला असून, देशातच लोकशाहीचा गळा घोटण्यात आला असून, एकच व्यक्तीची हिटलरशाही आणि हुकूमशाही आहे. जनतेला भुलवून देशात आणि राज्यात सत्तेवर आलेले भाजपचे सरकार हे सुटबुट वाल्यांचे सरकार आहे. आजही अनेक उद्योगपतींचा दिवसाचा निव्वळ नफा काही कोटींच्या घरात आहे, हे विसरुन चालणार नाही. या सरकारला सामान्य जनता आणि शेतकर्‍यांविषयी काहीही देणेघेणे नाही. लोकशाहीच्या चिंध्या करत हुकूमशाहीने देशात पाठीमागच्या दारातून आणीबाणी आणली आहे. हे सरकार सत्तेतून घालविल्याशिवाय जनतेचे भले होणार नाही, अशी टिका पवार यांनी केली.

महाराष्ट्रातील आजची परिस्थिती विदारक आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. 201 तालुक्यांमधील 20 हजार गावांमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत भूमिका घेत नाही. दुष्काळाबाबतचे निकष केंद्र सरकारने बदलले असून, त्यामधून पीक पैसेवारी वगळली आहे. त्यामुळे आता केंद्रीय पथकाने पाहणी केल्याशिवाय राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची श्‍वासती नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यात मुख्यमंत्र्यांनी लगेच दुष्काळ जाहीर केला, मात्र राज्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, याहून दुसरे दुर्दैव नाही. जलयुक्त शिवार योजनेचा केवळ बोभाटा केला, मात्र आजही टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, अशी टीका त्यांनी केली.

भाजप आणि शिवसेना केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये कसलाही समन्वय नाही. दोघेही सत्ता उपभोगत ऐकमेकांना शिव्या घालण्याचे काम करत आहेत. दसर्‍याच्या दिवशी मुंबईत तसेच घडले. सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये एकमत नाही, दोघेही एकमेकांना नालायक म्हणतात आणि शिव्या देखील घालतात, मात्र सत्तेतून बाजूला व्हायचे नाही, टीका करत जनतेची भालवण करण्याचे एकमेव काम हाती घेण्यात आले आहे. विकासकामांच्या नावाखाली जनतेपुढे जाता येणार नसल्याने भाजपने पुन्हा एकदा आयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे आणून निवडणुका जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. शिवसेनेने देखील राममंदिराचा मुद्दा घेतला आहे. आता ते आयोध्येत जाऊन काय दिवा लावणार आहेत. केंद्रात तर एकत्र बसतात आणि नुसती टिका करतात, याला काय अर्थ आहे, अशा शब्दात अजितदादांनी सरकारचा समाचार घेतला.

राज्यातील जनता जगू दे अगर मरु दे, मात्र निर्णय काही घ्यायचे नाही, असे सरकारचे धोरण आहे. एकीकडे शेतीमालाला हमीभाव द्यायचा नाही, खरेदी केलेल्या धान्याचे पैसे द्यायचे नाही, महागाई तर प्रचंड वाढवून ठेवली आहे. जीसीएसटीद्वार तर महागाई वाढवून ठेवली असून, पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. सरकारला जनतेसाठी वेळ नाही, हे सरकार सुटाबुटातल्या उद्योगपतींचे आहे. हे सरकार घालविल्याशिवाय राज्यात शेतकरी सुखा समाधानाने नांदू शकत नाही. दुष्काळ, शेतीमालाचे हमी भाव, राफेल मुद्दा, महिला अत्याचार, घर पोहोच दारु, महागाई, महापुरुषांची बदनामी या विषयावरुन सरकारच्या भूमिका कशा चुकीच्या आहेत, हे अजितदादांनी दाखवून दिले.रामराजे नाईक -निंबाळकर म्हणाले, कोरेगावातील आजचा विराट मेळावा पाहून या मतदारसंघात आ. शशिकांत शिंदे यांच्यामागे जनतेची विशेषत: युवक वर्गाची ताकद आहे, यासाठी दुसरा पुरावा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

धनंजय मुंडे म्हणाले, खा. शरद पवार यांना सर्वसामान्य कार्यकर्त्याची जाण आहे. त्यांच्यामुळेच आज एक ऊस तोडणी कामगाराचा मुलगा एका माथाडी कामगाराच्या मुलाचा सत्कार करु शकत आहे. हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच घडू शकते. सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्रीपद देण्याची भूमिका केवळ खा. पवार हेच घेऊ शकतात. आ. शिंदे यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यांनी विकासकामांद्वारे मतदारसंघात जनतेचा विश्‍वास संपादन केला आहे. गेले तीन वर्षे सलग वाढदिवसाच्या कार्यक्रमांना मी येत आहे, मी दरवर्षी पाहतोय की, आ. शिंदे यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. युवक वर्गाचा पाठिंबा असल्याने त्यांना अश्‍वमेध कोणी रोखू शकत नाही.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, 2009 मध्ये ज्या मैदानावरुन कोरेगावचा आमदार झालो, त्याच मैदानावर आज विराट मेळाव्याद्वारे वाढदिवस साजरा होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. चंद्रकांतदादा पाटील म्हणतात की या जिल्ह्यात एक खासदार आणि पाच आमदार भाजपचे निवडून येतील, त्यांना मी सांगू इच्छितो की, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तो कुणाचा बाप देखील तोडू शकत नाही. जनतेच्या विशेषत: युवकांच्या पाठबळावर विरोधकांचे डिपॉझीट तोडण्याची क्षमता पक्षाच्या आमदारांमध्ये आहे. जनतेच्या प्रेमामुळेच आजवर इथपर्यंत पोहोचलो आहे. भविष्यात देखील जनतेच्या ऋणात राहणार असून, शेवटच्या श्‍वासापर्यंत खा. शरद पवार व आ. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सत्तेवर असलेल्या निष्क्रिय सरकारने दबावाचे राजकारण सुरु केले असून, विरोधकांना पोलिसांमार्फत अडकविण्याचे प्रकार राजरोस सुरु झाले आहेत. याबाबत मी आवाज उठविणार आहे. पुसेगावात प्रमुख कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले असून, 21 तारखेला पुसेगावात आंदोलन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी आ. बाळासाहेब पाटील यांचे भाषण झाले. आ. अजित पवार व आ. शशिकांत शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सुनील माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संतोष कणसे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश चव्हाण यांनी आभार मानले.

आ. अजित पवार यांनी स्वपक्षातील निष्ठावंत म्हणवणार्‍या कार्यकर्त्यांना चांगलाच शब्दांचा मार दिला. खा. शरद पवार आणि माझ्या दौर्‍यात नेमके काहीतरी पत्र द्यायचे आणि वातावरण बिघडून टाकायचे, असे प्रकार निदर्शनास आले आहे. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेदामध्ये न पडता, एकोप्याने काम करुन खा. शरद पवार यांचे हात बळकट करावेत. कोठेही विद्यमान आमदाराला अथवा पक्षाला त्रास होईल, असे वागू नये, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. पश्‍चिम महाराष्ट्रावर गेल्या चार वर्षात झालेला अन्याय दूर करायचा असेल तर सातारा आणि माढा मतदारसंघातून पक्षाचे खासदार निवडून दिले पाहिजेत. मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची ताकद एकवटली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रामराजे नाईक-निंबाळकर हे आज भलत्याच मुडमध्ये होते. त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांना थेट हिरोची उपमा देऊन टाकली. त्यांच्या भाषणावेळी व्यासपीठाजवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अगदी एकच राजा.. अशा घोषणांना सुरुवात होताच, रामराजेंनी त्यांना हाताने इशारा करुन शांत राहण्यास सांगितले. मला पिना मारायची गरज नाही, मी बोलतोच. कोणी चिडवले अथवा डिवचले तर बोलणारच. चांगल्या कामात कोणी पिना मारु नका, अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. आ. शिंदे यांच्या कार्यपध्दतीबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

No comments

Powered by Blogger.