शाहूनगरातला बिबट्या लय हुश्शार...!


शाहूपुरी : काही दिवसांपासून शाहूनगर परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नाही. पिंजरा लावूनही बिबट्या वारंवार चकवा देत आहे. बिबट्याच्या या हुशारीपुढे वनविभागाचे कर्मचारीही हतबल झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाद्याचा बळी जाण्याच्या अगोदर वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होवू लागली आहे. दरम्यान, बिबट्या वारंवार हुलकावणी देत असल्याने वनविभागाने शाहूनगर परिसरातील पिंजरा हलवला आहे.शाहूनगर मंगळाईदेवी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या मानवीवस्तीत येवून कुत्र्याच्या पिल्लांना आपले भक्षक बनवत आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने या परिसरातील बिबट्याचा वावर स्पष्ट झाला. 

यानंतर वनविभागाने घटनास्थळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावून कर्मचारीही तैनात केले. परिसरात रात्रगस्तही सुरू केली परंतू बिबट्याने कर्मचार्‍यांना व पिंजर्‍यालाही चकवा दिल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. बिबट्याच्या या हुशारी पुढे वनविभागाचे कर्मचारीही हतबल झाले आहेत. बिबट्याला पकडायचे तरी कसे असा प्रश्न ‘आ’ वासून वनविभागापुढे उभा राहिला आहे. बिबट्या रात्रीच्या सुमारास मानवी वस्तीत जरी फिरकत असला तरी अजूनही परिसरात कुणा नागरिकांवर हल्ला केलेला नाही. बिबट्याने आत्तापर्यंत कुत्र्यांची पिल्लेच टारगेट केली असली तरी त्याला भक्ष्य मिळाले नाही तर तो नागरिकांवरही हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही. या भितीमुळे या परिसरात राहणारे नागरिक दिवसाही घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. ‘आमचा जीव जाण्यापूर्वी या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा’, अशी आर्त हाक या परिसरातील नागरिकांनी वनविभागाला दिली0 आहे.


No comments

Powered by Blogger.