पोवई नाक्यावर 'ग्रेड सेपरेटर'चा भराव खचला


सातारा : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोवई नाका परिसरात ग्रेड सेपरेटर चे काम सुरु आहे. गणेशोत्सवादरम्यान यामधील एक लेन सातारकरांसाठी खुली करण्यात आली. याच लेनवरून शुक्रवारी सकाळी स्टील घेऊन निघालेल्या ट्रकच्या वजनाने एका बाजूचा भराव खचला. यामुळे ट्रक चांगलाच अडकून पडला होता. वाहतूक कोंडी वाढत असल्याने हा ट्रक बाहेर काढण्यासाठी अखेर क्रेनची मदत घ्यावी लागली. 

यामुळे तब्बल अर्धा तास वाहनधारकांना ताटकळत बसावे लागले. दोन-तीन दिवसांपासून सातारा शहरात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे हा भराव खचला असल्याचे परिसरात बोलले जात आहे.साताऱ्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर मंजूर झाला होता. या प्लँटसाठी 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यांपासून हे काम सुरू आहे. 

शुक्रवारी सकाळी नऊच्या दरम्यान स्टीलने भरलेला एक ट्रक खालच्या रस्त्यावर जाण्यासाठी निघाला होता. हा ट्रक भराव टाकलेल्या ठिकाणी आला असता ट्रकच्या वजनाने डाव्या बाजूचा भराव खचला. ट्रक चालकाने अनेक प्रयत्न करूनही ट्रक खड्ड्यातून बाहेर येत नसल्याने हळूहळू वाहतूक कोंडी होऊ लागली. यानंतर अखेर क्रेनला पाचारण करण्यात आले. तब्बल वीस मिनिटांच्या मशक्कतीने क्रेनच्या साह्याने हा ट्रक बाहेर काढण्यात आला.

No comments

Powered by Blogger.