आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

दारू पिऊन ड्रायव्हिंग करणार्‍या शिवशाही बस चालकावर गुन्हा नोंद


सातारा : शिवशाही बसचे अनेक कारणामे उघड होत असतानाच त्यावरील एका चालकाने चक्क मद्यप्राशन करुन बस चालवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने डेपोसह प्रवाशांमध्ये खळबळ उडाली असून, शिवशाही बसचा प्रवास रामभरोसे सुरु असल्याचेच आता स्पष्ट झाले आहे.दत्तात्रय बाळकृष्ण कदम (वय 34, रा.सायगाव) या चालकावर गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणी सातारा बसस्थानक प्रमुख राहूल श्रीरंग शिंगाडे यांनी तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे बसस्थानकामध्ये पाहणी करत होते. 

त्यावेळी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस क्रमांक (एम.एच. 14 बीजी 1644) पुणेहून सातार्‍यात आली. तक्रारदार शिंगाडे यांनी चालकाला वाहन चालवण्याचा परवाना, गाडीचे कागदपत्रे मागितली व चालकाला त्याचे नाव विचारले. यावेळी चालक नाव सांगत असताना अडखळला व त्याच्या तोंडातून दारुसारखा उग्र वास आला.

यावेळी शिवशाहीवरील बसचालक दत्तात्रय कदम याला बसस्थानकामध्ये नेण्यात आले. तेथे त्याला मद्य सेवन केल्याबाबत विचारले असता, त्याने मद्यसेवन केले असल्याची कबुली दिली. यावेळी चालकाने तसे लेखीही लिहून दिले. दरम्यान, वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलणे झाल्यानंतर याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली. ही सर्व घटना दि. 16 रोजी घडली आहे. शिवशाही बस चालकांबाबत अनेकदा तक्रारी होत असल्याचे वास्तव आहे. अशातच सातारा शहर पोलिस ठाण्यात यावरील चालकावर दारु पिऊन एसटी चालवल्याचा गुन्हा दाखल झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.