Your Own Digital Platform

पॉलिश करण्याच्या बहाण्याने सव्वा लाखाचे दागिने लांबवले


ओझर्डे (जि. सातारा) : सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असा बहाणा करून काळंगवाडी येथे १ लाख २५ हजार रुपयांचे सहा तोळे तीन ग्रॅम सोने लंपास केले. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काळंगवाडी, ता. वाई येथे नम्रता निलेश काळंगे, दिपाली मंगेश काळंगे आणि प्रियांका शैलेश काळंगे या घरात बसल्या असताना दोन अनोळखी तरुण दुचाकी वरुन आले. त्यांनी नम्रता काळंगे यांना आम्ही भांडी आणि दागिने पॉलिश करून देतो असे सांगितले.

 त्यानुसार नम्रता, प्रियांका आणि दिपाली यांनी प्रथम भांडी आणि नंतर चांदीचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले. चांदीचे दागिने पॉलिश करून दिल्यानंतर या सर्वांनी त्या दोघांजवळ ६० हजार रुपये किमतीचे ३ तोळे वजनाचे एक गंठण, ४० हजार रुपये किमंत असलेले १ तोळ्याचे दोन गंठण, २० हजार रुपये किंमत असलेली एक तोळे वजनाची सोन्याची चेन, साडेचार हजार रुपयांची एक अंगठी, असे एक लाख २४ हजार पाचशे रुपये किमतीचे सहा तोळे सोन्याचे दागिणे पॉलिश करण्यासाठी दिले.

दागिने मिळाल्यानंतर त्या दोघांनी या सर्वांना पॉलिश करण्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळून हळद टाकून आणण्यास सांगितले. या सर्व घरात गेल्याचे पाहून दोन्ही तरुण दुचाकीवरून पसार झाले. या प्रकरणी नम्रता काळंगे यांनी फिर्याद दिली आहे.