दुर्गामातेला भावपूर्ण वातावरणात निरोप


सातारा : ‘उदे गं अंबे उदे, अंबामाता की जय, दुर्गामाता की जय’ च्या जयघोषात सातारा शहरासह जिल्ह्यातील 2106 सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत गुलाल, फुलांची उधळण करत भक्तीमय वातावरणात मिरवणुका काढून दुर्गादेवींचे विसर्जन केले. सातारा शहरात दुर्गामातेची सुमारे 16 तास मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीतही डॉल्बी हद्दपार होवून पारंपरीक वाद्यांचाच बोलबाला राहिला. सातारा शहरात 78 तर जिल्ह्यात 2106 सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली होती. 403 गावात ‘एक गाव एक देवी’ उपक्रम राबवण्यात आला तर जिल्ह्यात 108 ठिकाणी जागेवरच दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात आले. नऊ दिवस सर्वत्र आदिशक्ती व आदिमायेचा जागर भक्तीमय वातावरणात सुरू होता. जिल्ह्यातील नवरात्र उत्सव मंडळांनी उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ठिकठिकाणी रास दांडिया, गरबाही पार पडला. अनेक मंडळांनी यावेळी दुर्गामातेच्या प्र्रतिष्ठापनेपासूनच विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

गुरुवारी सकाळपासूनच सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध नवरात्र उत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली होती. मानाच्या नवरात्र उत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका दुपारी सुरू झाल्या. टॅक्ट्रर ट्रॉलीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामध्ये दुर्गामातेची मूर्ती ठेवण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल व फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत सातारा शहर व परिसरात विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली.

ठिकठिकाणी गुलालांची उधळण केल्याने रस्ते गुलालाने चांगलेच माखले होते तर काही मंडळांचे कार्यकर्ते वाद्यांच्या तालावर बेधुंदपणे नाचताना दिसत होते. अनेक मंडळांनी पारंपारिक वेशभुषेत मिरवणूक काढली. बर्‍याच मंडळांनी मिरवणुकीसमोर रास-दांडियासह मर्‍हाटमोळी गीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. काही मंडळांच्या महिला कार्यकर्त्यांनी मिरवणूक मार्गावर विविध प्रकारच्या आकर्षक रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटल्या. रेखाटण्यात आलेले गालिचे विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

मुख्य मानाच्या नवरात्र उत्सव मंडळांच्या दुर्गामाता मिरवणुकीला रात्री 7 वाजता प्रारंभ झाला. त्यामुळे सायंकाळनंतर शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. काही ठिकाणचे रस्ते बंद ठेवण्यात आले होते. अनेक नागरिक दुतर्फा उभे राहून मिरवणुकीचे स्वागत करत होते. काही ठिकाणी दुर्गामाता मूर्तीवर भाविक फुलांचा वर्षाव करताना दिसत होते. पावसाच्या जलधारा कोसळत असतानाही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कन्या शाळा परिसरात सदरबझार येथील भारत माता नवरात्रोत्सव मंडळ आणि सम्राट नवरात्रोत्सव मंडळाच्या देवींच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी शाहूनगरीतील भाविकांनी अलोट गर्दी केली. या भेटीचा आनंद मोबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ लागली. या भेटीत फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यामुळे आसमंत उजळून निघाला.

विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलातर्फे चौकाचौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सातारा शहरात रात्री 12 वाजता मंडळांनी वाद्ये बंद केली. सातार्‍यात सुमारे 16 तास दुर्गामातेची विसर्जन मिरवणूक सुरू होती. शहरातील 78 हून अधिक सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी रात्री उशिरापर्यंत प्रतापसिंह शेती उद्यानातील कृत्रिम तळ्यात व संगममाहुली येथे दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन केले.

No comments

Powered by Blogger.