शरद पवारांसमवेत जावडेकर आज ‘रयत’च्या व्यासपीठावर


सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री, भाजपचे ना. प्रकाश जावडेकर हे गुरुवारी कर्मवीर समाधी परिसरात एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत. शरद पवार व जावडेकर एकमेकांसंदर्भात काय बोलणार, याविषयी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक वर्तुळात उत्सुकता आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभ्या हयातीत बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम केले. कर्मवीरांनी उभ्या केलेल्या रयत शिक्षण संस्थेची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या खांद्यांवर आहे. 

गेली कित्येक वर्षे पवार रयत शिक्षण संस्थेच्या भव्य दिव्य सोहळ्यांना उपस्थित असतात. राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदीसंदर्भात विधान केल्याने शरद पवारांवर नुकतीच टीकेची झोड उठली होती. मात्र, त्यानंतर बीड येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत पवारांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. राफेलवरून अजूनही वातावरण गरम असतानाच शरद पवार गुरुवारी सातार्‍यात येत आहेत. विशेष म्हणजे, या खेपेला त्यांच्यासमवेत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री ना. प्रकाश जावडेकर हे आहेत. जावडेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. कर्मवीर रयत शिक्षण

संस्थेच्या व्यासपीठावर ते शरद पवारांच्या शेजारी बसणार आहेत. त्यांच्या हस्तेच रयतच्या शताब्दी महोत्सव सोहळ्याला प्रारंभ होणार असल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. सातार्‍याला तसे जावडेकर नवे नाहीत. जावडेकर पूर्वी सातारा, सांगली शिक्षक पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवायचे तेव्हा अनेकदा त्यांचे सातारा दौरे व्हायचे.

रयत शिक्षण संस्थेच्या व्यासपीठावर शरद पवार जावडेकरांसंदर्भात काय बोलणार? व जावडेकर पवारांसंदर्भात काय बोलणार? याविषयी त्यामुळेच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

No comments

Powered by Blogger.