बनपूरकर कॉलनी ‘ना घर की ना घाट की’


कराड : कराड शहरातील शनिवार पेठेतील बनपूरकर कॉलनीची ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे. या कॉलनीतील काही भाग मलकापूर नगरपंचायत, काही भाग कराड नगरपालिकेत तर काही भाग वाढीव हद्दीमध्ये मोडतो त्यामुळे ना मलकापूर ना कराडमध्ये अशी अवस्था या भागाची असल्याने रस्ता, ड्रेनेज, गटारे नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सुपर मार्केटमधील पी. डी. पाटील उद्यान परिसरात असणारी बनपूरकर कॉलनी गेल्या अनेक वर्षापासून विविध सुविधांपासून वंचित आहे.

 या भागात अनेक कुटुंबांचे वास्तव्य आहे. मात्र पालिकेकडून नागरिकांना सुविधा देण्यात आल्या नाहीत. या कॉलनीतील काही भाग मलकापूर नगरपंचायत, काही भाग कराड नगरपालिकेमध्ये समाविष्ठ आहे. तर काही भाग गेल्या अनेक वर्षापासून त्रिशंकूमध्ये होता, सध्या तो भाग वाढीव हद्दीत आहे. या भागातील नागरिकांना अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे. या भागातील रस्ते अत्यंत खराब आहेत. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते तर उन्हाळ्यात उखडलेल्या रस्त्यांवरील धुळीचा सामना नागरिकांना करावा लागतो. कॉलनीकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब आहे. अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही दयनीय आहे. काही भागात नागरिकांनी स्वत:च रस्त्यांवर मुरूम टाकले आहेत.

 ड्रेनेज व गटारे नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून धावत असते. त्यामुळे अनारोग्य निर्माण झाले आहे. डासांचा प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही ठिकाणी नागरिकांनी स्वत:च गटारे काढली आहेत. मात्र त्याची साफसफाई पालिकेकडून होत नसल्याने गटारांमध्ये झाडे उगवून गटारे पॅक झाली आहेत.

मलकापूर भागातून येणार्‍या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे मलकापूर नगरपंचायतीने बंदिस्त गटारे काढणे आवश्यक आहे. मलकापूर व कराड या दोन्ही हद्दीत असणार्‍या या भागातील कुटुंबांना दोन्हीकडूनही सुविधा मिळत नसल्याने ना घर का, ना घाट का अशी अवस्था या कॉलनीची झाली आहे. घंटागाडीचीही या भागात अशीच अवस्था असून घंटागाडीही वेळेत येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

कराड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या भागातील रस्त्यांबाबत चर्चा होवून रस्त्याचे डांबरीकरणे करण्याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी वर्कऑर्डर दिली आहे. या भागातील गटारांचे कामही करणार आहे. मलकापूर मधून येणार्‍या पाण्याचा निचरा होण्यासाठी त्या नगरपंचायतीने गटर काढल्यास कराड पालिकेकडून काढण्यात येणार्‍या गटारांना ती गटारे जोडण्यात येतील.पालिकेच्या हद्दीतील गटारांसाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरच ती कामे करण्यात येणार आहेत, असे नगरसेवक वैभव हिंगमिरे यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.