प्रेमीयुगुलांकडून ‘चारभिंती’चे विद्रुपीकरण


सातारा : सातार्‍यातील ऐतिहासिक वास्तू असणार्‍या चारभिंती परिसराची दूरवस्था झाली असून मुख्य भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिला जात असल्याने इतिहासप्रेमींमध्ये संताप असून या ऐतिहासिक वास्तूचे चांगल्याप्रकारे जतन केले जावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.या वास्तूकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. यामुळे या वास्तूचे सौंदर्य बिघडत आहे. तरुण वर्गाकडून येथे कचरा टाकल्यामुळे येथे कचर्‍याचेही साम्राज्य आहे. या वास्तूची जपणूक करण्यासाठी पालिकेने कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

शूरांचा व क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातार्‍याची ओळख आहे.प्रत्येक तालुक्यात ऐतिहासिक वास्तू असून त्याची योग्य ती जपणूकसुध्दा करण्यात आली आहे. शहराच्या जवळच ‘चारभिंती’ ही ऐतिहासिक वास्तू असून याठिकाणी असलेल्या शिलालेखात 1857 च्या लढ्यात सातारा तालुक्यातील शहीद झालेल्या क्रांतिकारकांची माहिती मिळते. सर्व माहिती ही शिलालेखात असल्याने ती शाबूत आहे. याबरोबरच लढाईची पार्श्‍वभूमी ते शेवटपर्यंतचा इतिहास या ठिकाणी पाहता येतो.

जिल्हा व जिल्ह्याबाहेरील अनेक पर्यटक अजिंक्यतारा किल्ला व चारभिंती या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येत असतात. येथील निसर्ग व इतिहास याची सांगड घालून या वास्तू विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र, क्रांतिकारकांचा इतिहास असणार्‍या चारभिंतीला जणू काही ग्रहण लागले आहे. या ठिकाणी स्थानिक लोकसुध्दा मोठ्या प्रमाणावर भेट देतात. त्याचप्रमाणे युवक व युवतींही मोठ्या प्रमाणात याठिकाणी भेट देतात. सकाळी 9 ते 12 व दुपारी 4 ते 7 या कालावधीत युवक-युवती तसेच स्थानिक नागरिक या ठिकाणी येत असतात. ही वास्तू सातारा शहराची शान असून याची निगा राखणे जरूरीचे आहे. मात्र, याकडे पालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे.

महिना किंवा दोन महिन्यांतून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत सातत्य असणे गरजेचे आहे. ही ऐतिहासिक वास्तू आपली असून आपणच याचा सांभाळ केला पाहिजे, अशी भावना प्रबोधनाच्या माध्यमातून युवकांमध्ये रूजविली पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. येणारे पर्यटक, नागरिक व युवक वर्ग काही तरी खाद्यपदार्थ आणून याठिकाणी खाण्याचा आनंद लुटतात. मात्र, त्यामुळे याठिकाणी कचरा निर्माण होतो. हा कचराही साफ करणे गरजेचे आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एका संस्थेकडून वास्तूचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी या परिसरात दोन सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. त्यांना तेथून का हलवण्यात आले? याबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे नगरपालिकेने याठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावा, अशी मागणी सातारकरांसह, पर्यटकांमधून होत आहे.

No comments

Powered by Blogger.