Your Own Digital Platform

दोन्ही राजे एकत्र मात्र, अबोला कायम


सातारा : जुना मोटार स्टँड येथील दारू दुकान हटवण्यावरून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजांचा कडवा संघर्ष झाल्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंतही पोहाचले. असे असले तरी सोमवारी मात्र हेच दोन्ही राजे सातार्‍यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. एवढेच काय तर दोघेही शेजारी शेजारीच बसले होते. संपूर्ण कार्यक्रमात दोन्ही राजांची जवळ बसणे लक्षवेधक ठरले असले तरी त्यांच्यातील अबोला मात्र कायम असल्याचेच दिसून आले.महाबळेश्‍वर-सातारा-धामणेर या रस्त्याच्या सुधारणा कामांचे भुमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले.

 या कार्यक्रमात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या दोन्ही राजांमध्ये सुमारे वर्षभरापासून कडवा संघर्ष उफाळून आला आहे. अगोदर आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन ठेका व अलिकडे जुना मोटार स्टॅड येथील दारू दुकान हटवण्यावरून त्यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाल्याने त्यांच्यामधून विस्तवही जात नाही. दोन्ही राजांमध्ये पत्रकबाजीतून टिकास्त्रही सुरूच आहे.सोमवारी मात्र सातारकरांना हेच दोन्ही राजे एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले पहायला मिळाले. महाबळेश्‍वर -सातारा -धामणेर रस्त्याच्या सुधारणा कामाचे भुमिपूजन बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी दोन्ही राजे उपस्थित होते.

दोघेही शेजारी शेजारी बसले होते. मात्र त्यांनी कार्यक्रम संपेपर्यंत एकमेकाकडे ढुंकूनही पाहिले नाही. खा. उदयनराजे निमंत्रण पत्रिका पाहण्यात तर आ. शिवेंद्रराजे मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असताना चित्र दिसले. एकमेकांशेजारी बसूनही त्यांनी एकमेकांना दुर्लक्षितच केल्याचे पहायला मिळाले. कार्यक्रम संपल्यानंतरही दोन्ही राजे दोन्ही दिशेला निघून गेले. आ. शिवेंद्रराजे आपल्या गाडीतून मार्गस्थ झाले तर खा. उदयनराजे मात्र ना. चंद्रकांत पाटील यांच्या गाडीतून निघून गेले. खा. उदयनराजे व ना. चंद्रकांत पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे सातार्‍यात राजकीय चर्चांना उधाण आले. खा. उदयनराजे व ना. चंद्रकांत पाटील यांच्या या एकत्र प्रवासात नक्की विकासकामांची चर्चा होती का राजकीय चर्चा झाली? याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. खा. उदयनराजे यांच्यासारखा हुकूमाचा एक्का आपल्या पक्षात असावा, यासाठी आता भाजपा धडपड करताना पहावयास मिळत आहे.

रविवारी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सातार्‍याचे खा. उदयनराजे भोसले यांच्याबद्दल राष्ट्रवादीत नाराजी दिसत असल्याचे वक्‍तव्य करताना ते भाजपामध्ये येणार असतील तर त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे उघडे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे सोमवारी सातारा जिल्हा दौर्‍यावर असणार्‍या ना. चंद्रकांत पाटील यांच्या गाडीतून खा. उदयनराजे यांनी प्रवास केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.