आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

अंबेनळी घाट मृत्यूचा जबडा


महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर-पोलादपूर राज्य मार्गावर अंबेनळी घाटामध्ये दुधोशी फाट्याजवळ गेल्या महिन्यात मुख्य रस्त्यावर महाकाय दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने दरड बाजूला सरकावून केवळ ‘दिखावा’ करण्यात आला. मात्र, ही महाकाय दरड हटवण्यासाठी कोणतीच उपाययोजना न राबवल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यातच नादुरुस्त संरक्षण कठडे, खड्ड्यात गेलेले रस्ते यामुळे दुष्काळात तेरावा, असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.महाराष्ट्राचे नंदनवन असलेले महाबळेश्‍वर आता दिवाळी हंगामासाठी सज्ज झाले असून पर्यटक हळूहळू या थंड हवेच्या पर्यटनस्थळी गर्दी करीत आहेत. येथील प्रेक्षणीय स्थळांसोबतच निसर्गरम्य तापोळा,ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर देखील हौशी पर्यटक भेटी देतातच. मात्र, महाबळेश्‍वर- पोलादपूरला जोडणार्‍या मुख्य राज्यमार्गावर असलेला आंबेनळी घाट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महाबळेश्‍वर तालुक्यातील प्रतापगड व भागातील दुर्गम खेडेगावांकडे जाण्यासाठी व कोकणाला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. 

या मुख्य असलेल्या आंबेनळी घाटरस्त्यावर पावसाळ्यामध्ये वारंवार दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे हा रस्ता धोकादायक झाला असून गेल्याच महिन्यात महाबळेश्‍वर प्रतापगड या घाटरस्त्यावर दुधोशी फाट्याजवळ महाकाय दरड पहाटेच्या सुमारास रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेएसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला सरकवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केल्याचा केवळ दिखावा केला. इथली खरी परिस्थिती पाहिली असता महाकाय दरड मुख्य मार्गावर धोकादायक स्थितीत जैसे थेच असून केवळ एक छोटे वाहन जाईल इतकीच जागा या ठिकाणी शिल्लक आहे.

एस टी चालकाच्या कौशल्याने या धोकादायक ठिकाणावरून कशीबशी निघते तर दोन छोट्या बसेस जरी समोरासमोर आल्यातरी एका बाजूला महाकाय दरड तर दुसर्‍या बाजूला खोलच खोल दरी, अशा रस्त्यावरून वाहनचालकांना पर्यायाने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. भरीस भर म्हणजे या संपूर्ण घाटरस्त्यावरचे रस्तेच खड्ड्यात गेले आहेत का ? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. कारण पूर्ण घाटरस्त्यावर खड्डयांचीच जणू स्पर्धा लागली असून एकापेक्षा एक असे मोठमोठाले खड्डे या रस्त्यावर पहावयास मिळतात.