फसवणूकप्रकरणी आणखी चौघांना अटक


सातारा: सातार्‍यातील एका नामांकित कंपनीचा बँकेशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक सिम स्वाईप करून बँक खात्यातील सुमारे 38 लाख रुपये देशातील विविध राज्यांमध्ये ट्रान्स्फर केल्या प्रकरणातील आणखी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अन्य दोन फसवणूक केलेल्या गुन्ह्यांची उकल झाली असल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख पंकज देेशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी सातारा सायबर पोलिसांनी यापूर्वी दोघांना अटक केली होती.

दिलशाद निसार अहमद (वय 35, रा. असलातपूर, उत्तरप्रदेश), सोनु सुनील कुमार (वय 34, रा. चंदिगढ), संजय दिलबाग राय शर्मा (वय 52, रा. देहरादून, उत्तराखंड. आणि इम्तियाज अन्जार अहमद (वय 40, रा. बुर्‍हानपुरा, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पंकज देशमुख म्हणाले, 13 ऑगस्ट रोजी सातार्‍यातील एका कंपनीच्या बँक खात्याशी असणारे सिम स्वाईप करून 37 लाख 78 हजार रूपये पंजाब, दिल्‍ली, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या राज्यातील विविध बँकांमध्ये ट्रान्सफर करून कंपनीची फसवणूक केली होती. याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू होता. यापूर्वी पोलिसांनी झिरकपूर, पंजाब येथून अभिषेक सुनील कुमार व यादविंदर नरींदर सिंग यांना अटक केली होती.

या दोघांकडे अधिक चौकशी या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध सायबर पोलिस करत आहे. अटक केेलेल्या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सातारा पोलिसांचे एक पथक दिल्‍ली येथे दाखल झाले होते. दिल्‍लीतील आरोपीला अटक केल्यानंतर उर्वरित संशयित सावध होण्याची शक्यता होती. त्यामुळे तपास पथकाचे दोन भाग केले.

तपास पथकाने आखलेल्या नियोजनामुळे 4 दिवसांच्या कालावधीत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोनि पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली हा तपास करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी वाळीव, जि. पालघर येथील 32 लाख व लखनौ येथील 1 कोटी 25 लाख रूपये फसवणुकीचा गुन्हा केल्याचे कबुल केले.

या कारवाईत सपोनि जी. एस. कदम, एस. व्ही. लांडे, पोना विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, हवालदार निखील जाधव, सुशांत कदम यांनी सहभाग घेतले. तांत्रिक विश्‍लेषण करण्यासाठी हवालदार शंकर सावंत, महेश शेटे, पोना सचिन पवार, तुषार साठे, वर्षा खोचे अनिकेत जाधव, प्रवीण अहिरे, ज्योती कोंडावळे व यशोमती साळूंखे यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारामध्ये वापर करताना जागरूक व सतर्क असणे गरजेचे आहे. आपल्या बँक खात्याबाबत किंवा मोबाईल सिमकार्डबाबत कोणतीही माहिती शेअर करू नये. या प्रकारे आपली फसवणूक झाल्यास नजीकच्या पोलिस ठाण्यास किंवा सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.