ऐतिहासिक सदाशिवगडचे अस्तित्व धोक्यात


कराड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सदाशिवगडचे अस्तित्वच धोक्यात सापडले आहे. भूकंप संशोधन केंद्रासाठी जागा आरक्षित करताना गडाच्या संवर्धनाबाबत कमालीचा निष्काळजीपणा दाखवण्यात आल्याने आज याठिकाणच्या शिवकालीन ‘चिंच विहिरी’चे दोन भाग होणार की काय ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कराडपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असणारा सदाशिवगड छत्रपती शिवाजी महाराज यांनी 10 नोव्हेंबर 1659 साली अफजलखान वधानंतर ताब्यात घेतला होता. या गडाच्या संवर्धनाकडे शासनाचे प्रथमपासून दुर्लक्ष आहे. मात्र सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान, शिवराय ट्रेकिंग ग्रुप, डॉक्टर्स ग्रुप यासह हाताच्या बोटावर मोजण्याइतके शासकीय अधिकारी, गडावर व्यायाम, दर्शनासाठी येणार्‍या परिसरातील शेकडो लोकांनी स्वखर्चाने स्वकष्टातून सदाशिवगडाचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी गेल्या दहा ते बारा वर्षापासून शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच आज गडावर नक्षत्र उद्यान तसेच पाणी योजना यासारखे महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. 

गडावरील ऐतिहासिक पाऊलखुणा जवळपास नष्ट झाल्या आहेत. सुर्ली घाटाच्या दिशेला असणारा ‘बुरूंज’ आणि ओगलेवाडीकडून गडावर प्रवेश केल्यानंतर ‘चिंच विहीर’ हे दोनच शिवकालीन अवशेष आजवर तग धरून आहेत. मात्र या दोन अवशेषापैकी एक असलेली चिंच विहीर धोक्यात सापडली आहे.

गडाच्या पायथ्याला भूकंप संशोधन केंद्र असून या केंद्रासाठी आवश्यक जागा निश्‍चित करण्यासाठी दोन वर्षापूर्वी मोजणी झाली होती. त्यानंतर 22 एप्रिल 2016 तत्कालीन प्रांताधिकारी किशोर पवार यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर मागणीवर विचार करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तारेचे कुंपन घालण्याचे काम होऊन गडावरील विहिरीच्या परिसरापर्यंत खांब रोवण्यात आले आहेत.

मात्र सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या कामाला विरोध करत ‘गडाभोवती कुंपन घाला, पण गडावर कुंपन घालू नका’ असे सांगत रोवलेले खांब उद्धवस्त करण्याचा इशारा ठेकेदाराला दिला होता. त्यानंतर हे काम थांबवण्यात आले आहे. मात्र असे असले तरी आजही ‘चिंच विहिरी’चे अस्तित्व धोक्यात असून गडावरील जागा वगळून गडाच्या पायथ्याला शिल्लक असलेली अन्य जागा भूकंप संशोधन केंद्रासाठी दिली जावी, अशी मागणीही सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानकडून केली जात आहे.

No comments

Powered by Blogger.