Your Own Digital Platform

उदयनराजे स्वाभिमानाने भाजपमध्ये या!


सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. सध्या तुमचा राष्ट्रवादीत अपमान होत आहे. छत्रपतींचे वंशज हे काही साधे नाहीत. हे दाखवून देण्यासाठी तुम्ही स्वाभिमानाने भाजपमध्ये यावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केले.यावेळी डॉ. दिलीप येळगावकर म्‍हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांची राजकीय कारकीर्द ही भारतीय जनता पक्षात सुरू झाली आहे. ते जेव्हा आमदार होते त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी मी माझी निवडणूक सोडून एसपी कार्यालयात पोहचून जमाव शांत केला होता.

 मी भाजपचा जिल्हाध्यक्ष असल्यापासून छत्रपती घराण्याचा निष्ठावंत पाईक आहे. त्यामुळे मला या घराण्याविषयी खूप आदर आहे. मात्र आता सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा अपमान केला जात आहे.

खासदार उदयनराजे हे छत्रपति शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. त्यामुळेच त्यांचा जिल्ह्यासह राज्यात आदर केला जातो. राष्ट्रवादी त्यांचा अपमान झाला असून त्यांनी स्वाभिमानाने भाजपमध्ये यावे. जेम्स लेन प्रकरणावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपला रामराम ठोकला होता. हे प्रकरण भाजपशी संबंधित नव्हते. त्यामुळे हे त्यांचे पक्ष सोडण्याचे मोठे कारण नव्हते. आता सातारा लोकसभा उमेदवारीवरून खासदार उदयनराजे यांचा अपमान होत आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये यावे, असा पुनरुच्चार डॉ. येळगावकर यांनी केला.