कराडात घंटागाड्यांवर जिंगल गीत


कराड : कराड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भाग घेतल्यापासून शहरातील विविध ठिकाणची स्वच्छता मोहिम सुरू करण्यात आली आहे. या स्वच्छतेमध्ये सिंहाचा वाटा असणार्‍या सफाई कामगारांचा सत्कार पालिकेत करण्यात आला. तसेच यावेळी नगरपरिषदेने तयार केलेल्या स्वच्छता गीताच्या सी.डी. चे प्रकाशन नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, आरोग्य सभापती सौ. प्रियांका यादव, नगरसेविका सौ. मिनाज पटवेकर, फारूक पटवेकर, सौ. पल्‍लवी पवार, सौ. अनिता पवार, सौ. विद्या पावसकर, सौ. कश्मिरा इंगवले आदी नगसेविका व नगरसेवकांची उपस्थिती होती.

नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये हिरीरीने भाग घेवुन विविध उपक्रम राबविले व देशामध्ये 39 तर राज्यामध्ये 25 वा क्रमांक प्राप्त केला. यामध्ये शहरातील सर्व नागरीक, स्वच्छता दुत, सामाजिक संस्था, पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, मुख्याधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग मोठा होता. मात्र स्वच्छता करताना प्रत्यक्षात सफाई कामगारांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे या कर्मचार्‍यांचा सत्कार पालिका पदाधिकारी, अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी प्रकाशित करण्यात आलेले स्वच्छता गीताची संकल्पना व शब्दरचना मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले असून त्यास संगीत पद्मनाथ गायकवाड यांनी दिले आहे. दर महिन्यात वेगवेगळे गीत तयार करण्यात येणार असून नागरिकांना विविध स्वच्छता गीते ऐकावयास मिळणार आहे. यावेळी पालिकेत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.