Your Own Digital Platform

मृत जाहीर झालेली व्यक्‍ती घरी प्रकटली


कोरेगाव : घरातील व्यक्‍ती मृत झाली म्हणून रडारड सुरू असतानाच अचानक संबंधीत व्यक्‍ती घरी प्रकटल्याने कुटुंबियांची पाचावर धारण झाली. मात्र, त्याचवेळी आपली व्यक्‍ती सुखरूप परत आल्याने त्यांनी सुस्काराही सोडला. ही घटना कोरेगाव येथे मंगळवारी घडली.अनोळखी मृतदेहाची ओळख पटवताना गफलत झाल्यानेच हा प्रकार घडला.याबाबत अधिक माहिती अशी, कोरेगाव येथील देसाई पेट्रोल पंपानजिक जिल्हा परिषद शाळा क्र.1 जवळ अज्ञात व्यक्‍ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. 

त्या व्यक्‍तीला तातडीने कोरेगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे ती मृत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. मृत व्यक्‍तीचा चेहरा नीट ओळखू येत नव्हता. दरम्यान, पोलिसांनीही अनोळखी व्यक्‍तीचा आकस्मिक मृत्यू म्हणून पुढील सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया सुरू केली. नेमक्या त्याच वेळी लक्ष्मीनगर, कोरेगाव येथील कुटुंबियांनी आपल्या घरातील व्यक्‍ती बेपत्ता असून संबंधीत मृतदेह त्यांचाच असल्याचे सांगितले. 

त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी कुटुंबियांनी पुढाकार घेतला. यावेळी त्यांच्या घरी घरातील हक्‍काचा माणूस मृत झाल्याचे समजताच शोककळा पसरली. नातेवाईकांची रडारडी सुरू होती. अन्य नातलगांनाही फोनाफोनी झाली. मात्र, हे सुरू असतानाच बेपत्ता असलेली व मृत म्हणून जाहीर केलेली व्यक्‍ती घरी प्रकटली. या प्रकाराने सारेच अवाक् झाले.

त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचीही चांगलीच तंतरली. मृत व्यक्‍तीवर अंत्यसंस्कार केले नव्हते म्हणून बरे. पोलिसांची या घटनेने डोकेदुखी वाढली. मग हा मृतदेह नक्‍की कोणाचा? याचा शोध सुरू झाला. त्यावेळी ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. संबंधीत मृतदेह मुरलीधर ज्ञानदेव बागवडे वय 36 रा.कासार शिरंबे ता.कराड यांचा असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर संबंधीत कुटुंबियांकडे पोलिसांनी मृतदेह सोपवला.